शून्य थकबाकी होईपर्यंत कारवाई सुरू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नियमितपणे वीजबिल भरले जात नसल्याने थकबाकीचा मनोरा वाढत चालला असल्याने निर्माण झालेली आर्थिक कोंडी फोडण्यासाठी महावितरण कंपनीने पुणे विभागातही आता आक्रमक भूमिका घेतली आहे. कितीही रुपयांची थकबाकी असो, वीज तोडण्याची कारवाई केली जाईल, असा संदेश देत थकबाकीदारांविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात चार दिवसांमध्ये पुणे विभागात १९ हजार ४५२ वीजग्राहकांची बत्ती गुल करण्यात आली आहे. शून्य थकबाकी होईपर्यंत ही मोहीम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

थकबाकीची पूर्णपणे वसुली करण्याच्या दृष्टीने ‘शून्य थकबाकी’ ही मोहीम यापूर्वीही राबविण्यात आली होती. मात्र, कारवाई काहीशी शिथिल होताच डिसेंबरनंतर पुन्हा थकबाकीमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आता कारवाईशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात आल्याने थकबाकीदारांची वीज तोडण्यासाठी आणि थकबाकीची वसुली करण्यासाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. पुणे परिमंडलातील पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील ६ लाख ७८ हजार घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे १३२ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही संपूर्ण थकबाकी वसूल होईपर्यंत ही मोहीम कायम ठेवली जाणार आहे.

त्यातील १९ हजार ४५२ वीजग्राहकांचा वीजपुरवठा चार दिवसांमध्ये तोडण्यात आला आहे. त्यांच्याकडे १० कोटी ८४ लाखांची थकबाकी आहे. या मोहिमेत प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे आणि मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्व उपविभाग व शाखा कार्यालयप्रमुख अभियंते, लेखा अधिकारी तसेच हजारो जनमित्र सहभागी झाले आहेत.

पुणे शहरात आतापर्यंत ११ हजार ९८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा ४ कोटी ४६ लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांपोटी खंडित करण्यात आला. भोसरी व पिंपरी विभागअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील ३६५० वीजग्राहकांची वीज २ कोटी ४४ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आली आहे.

कुणाकडे किती?

  • ५ लाख ५९ हजार घरगुती ग्राहकांकडे ७५ कोटी ७९ लाख रुपयांची सर्वाधिक थकबाकी
  • १ लाख २ हजार वाणिज्यिक ग्राहकांकडे ४० कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी
  • १६ हजार ३६१ औद्योगिक ग्राहकांकडे १६ कोटी ३८ लाखांची थकबाकी

सहकार्य करा, कारवाई टाळा!

वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकीचा भरणा करणे, त्याची पावती संबंधित कार्यालयात दाखवणे, पुनजरेडणी शुल्क भरूनच वीजपुरवठा सुरू करून घ्यावा लागणार आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबिल भरणा केंद्र तसेच घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने महावितरणच्या www.mahadiscom.in  या संकेतस्थळावर आणि मोबाइल अ‍ॅपवरही वीजबिल भरता येते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Outstanding bill holders electricity cut off
First published on: 10-02-2018 at 02:26 IST