पुणे : एकीकडे राज्यात राज्य मंडळाशी संलग्न मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा लागू करण्यावरून वादविवादांच्या फैरी झडत असताना परदेशात राहून मराठी भाषा शिकणारेही विद्यार्थी आहेत. अमेरिका, कॅनडा, डेन्मार्क अशा देशांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळांची मराठी भाषा विषयाची परीक्षा दिली होती. या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन निकाल बुधवारी (९ जुलै) रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य मुक्त विद्यालय मंडळांचे प्रभारी सचिव प्रमोद गोफणे यांनी या निकालाबाबतची बाबतची माहिती दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका आणि राज्याचा शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. अनिवासी भारतीय मराठी पालकांच्या मुलांना मराठी भाषा शिकता यावी हा या कराराचा उद्देश होता. या कराराअंतर्गत बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका या संस्थेच्या अंतर्गत कॅनडा, डेन्मार्क, अमेरिका अशा देशांतील ६० मराठी शाळा-केंद्रातील इयत्ता पहिली ते आठवीच्या १०३ विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत प्रवेश घेतला.
या विद्यार्थ्यांना बालभारतीची पाठ्यपुस्तकेही उपलब्ध करून देण्यात आली होती. त्या पुस्तकांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी पूर्ण केला. त्यानंतर बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या मराठी भाषा विषयाच्या मूल्यमापनासाठी अमेरिका, डेन्मार्क, कॅनडा या देशातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी १८ मे रोजी संकलित मूल्यमापन परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
आता या परीक्षेचा निकाल https://msbos.mh-ssc.ac.in/ या संकेतस्थळावर बुधवारी (९ जुलै) दुपारी दोन वाजता जाहीर केला जाणार आहे. निकालात विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना या माहितीची मुद्रित प्रत घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक अर्हता, विद्याविषयक कौशल्ये प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र यथावकाश वितरित करण्यात येईल, असेही परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.