पुणेकरांचे आणि पर्यटकांचेही आकर्षण बनलेल्या वैशिष्टय़पूर्ण अशा पु. ल. देशपांडे उद्यानाला दहा वर्षे पूर्ण झाली असून उत्साही पुणेकरांनी आणि निसर्गप्रेमींनी उद्यानाची दशकपूर्ती समारंभपूर्वक साजरी केली. विशेष म्हणजे या समारंभात हे उद्यान साकारण्यासाठी ज्या कामगारांनी परिश्रम घेतले होते त्यांचा खास सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात आले. त्या बरोबरच बागेतील वैशिष्टय़पूर्ण वृक्षांची ओळखही तज्ज्ञांनी करून दिली.
सिंहगड रस्त्यावर महापालिकेने साकारलेल्या या उद्यानाची ओळख पु. ल. देशपांडे स्मृती उद्यान अशी आहे. पुणे-ओकायामा (जपान) या दोन शहरांमध्ये झालेल्या मैत्री करारानुसार हे उद्यान तयार करण्यात आले होते. महापालिकेचे तत्कालीन उद्यान अधीक्षक यशवंत खैरे यांच्या नेतृत्वाखाली हे उद्यान साकारले. उद्यान अतिशय भव्य जागेत साकारले असून हिरवळीचे विस्तिर्ण गालिचे आणि सुंदर तळी, त्यावरील लाकडी पूल, वृक्षराजी, छोटय़ा पायवाटा, ठिकठिकाणी लावलेली शोभिवंत झाडे अशा साऱ्याच गोष्टी या उद्यानाचे आकर्षण ठरल्या आहेत.
‘निसर्ग संवाद’ संस्थेतर्फे उद्यानाच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वृक्षराजीची माहिती प्रा. श्री. द. महाजन आणि डॉ. पराग महाजन यांनी दिली. पाईन, नेवर, चिनार असे वैशिष्टय़पूर्ण वृक्ष या बागेत असल्याचे त्यांनी सांगितले. शैलेश तुळपुळे यांनी पक्षी निरीक्षण कसे करावे याची माहिती देऊन पु. ल. देशपांडे उद्यानात कोणकोणते पक्षी येतात, त्यांच्या सवयी याची माहिती दिली. या उद्यानाचे काम महापालिकेच्या उद्यान विभागाने तसेच अन्य विभागांनी मिळून वेळेत पूर्ण केले होते. त्यात सर्व कामगारांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यासाठी उद्यानातील कामगारांचा या समारंभात खास सत्कार करण्यात आला. बालाजी काळे आणि अर्चना पेठे यांनी प्रातिनिधिक सत्कार स्वीकारला. उद्यान परिचय आणि निसर्ग परिचय असाही कार्यक्रम या वेळी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात यशवंत खैरे, उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, सहायक अधीक्षक संतोष कांबळे, देवराम पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. निसर्ग संवाद संस्थेचे नंदू कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर खैरे यांनी उद्याननिर्मितीचे अनुभव सांगितले. उद्याननिर्मितीचे हे अवघड काम कामगारांच्या सहकार्याने वेळेत पूर्ण करता आले असे ते म्हणाले. उद्यान विकसित होत असताना व उद्यान पूर्ण झाल्यानंतरच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते.