पाषाण बाणेर लिंक रस्ता परिसरातील पद्मविलास अपार्टमेंटच्या मागे असलेल्या टेकडीवरून वाहून येणारे आणि अपार्टमेंटच्या तीन इमारतींच्या छतावर साठणारे पाणी दर पावसाळ्यात वाया जात होते. पण गेल्यावर्षी इथल्या रहिवाशांनी जागरुकता दाखवली आणि या वाया जाणाऱ्या पाण्याच्या पुनर्वापरासाठी प्रयत्न सुरू केले. अपार्टमेंटमधील सर्वानी एकत्र येत पर्जन्यजल संचयाचा प्रकल्प राबवला आणि हा प्रकल्प यशस्वीदेखील झाला. या प्रकल्पामुळे वाया जाणारे लाखो लिटर पाणी वाचले आणि पद्मविलास अपार्टमेंट टँकरमुक्तही झाले.

पाण्याबाबतच्या जागरुकतेचा हा प्रयोग पद्मविलास अपार्टमेंट कंडोमिनियममध्ये बघायला मिळतो. संकुलाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र चुत्तर आणि समिती सदस्य व या प्रकल्पाचे प्रमुख रवींद्र ज्ञानसागर यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. पद्मविलास अपार्टमेंट टेकडीच्या उतारावार बांधण्यात आले आहे. त्यामुळे टेकडीच्या उतारावरून दरवर्षी पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात पाणी वाहून यायचे आणि हे पाणी अपार्टमेंटच्या प्रवेशद्वाराकडून बाहेर रस्त्यावर वाहून जायचे. या परिस्थितीचा विचार करून पावसाचे हे पाणी प्रवेशद्वाराजवळ अडवण्यासाठी सिमेंटचे चर बांधण्यात आले. या संकुलात अकरा मजली तीन इमारती असून या इमारतींच्या छतांवर पडणारे तसेच संकुलातील इमारतींच्या परिसरातील जमिनीवरून वाहणारे पाणी अडवण्यासाठीही आडवे चर बांधण्यात आले. चरांमधून अडलेले हे पाणी साठवण्यासाठी आठ हजार लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीत पाणी गाळण्याची शास्त्रशुद्ध व्यवस्था करण्यात आली आहे. वाळू, खडी, विटा व दगडांच्या थरांद्वारे हे पाणी गाळले जाते. गाळलेले हे पाणी लगतच्या साडेचार हजार लिटर क्षमतेच्या पुनर्भरण टाकीत जाते. ही टाकी दीडशे फूट खोल असलेल्या कूपनलिकेभोवती बांधण्यात आली आहे. या नलिकेच्या आवरणास असलेल्या छिद्रातून गाळलेले हे पाणी हळूहळू कूपनलिकेत साठवले जाते. या प्रकल्पामुळे टेकडीवरून वाहून येणारे आणि नंतर वाया जाणारे पाणी उपयोगात आणणे शक्य झाले आहे. शिवाय या प्रकल्पात साठवलेल्या पाण्याचा पुनर्वापरही केला जात आहे. संकुलातील सर्व सदनिकाधारकांनी या प्रकल्पाला साहाय्य केल्यामुळे तसेच समितीचे सदस्य अतुल गुप्ता, श्रेयस ढोरे, माधुरी घाटे, वर्षां करवा, निखील पंडित, सतीश माने यांनी या प्रकल्पात विशेष सहभाग घेतल्यामुळे प्रकल्प योग्यप्रकारे साकारला आहे. प्रकल्पात साठवलेले पाणी संकुलातील बागेसाठी वापरले जाते. या प्रकल्पामुळे वाहून जाणारे सर्व पाणी योग्यप्रकारे साठवले जात आहे आणि त्याचा पुनर्वापरही शक्य झाला आहे.