उत्सवी काळातील गर्दी हेरून गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखूची विक्रीसाठी आवक होतच असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारपासून अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत ८७ हजार रुपयांचा गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे.
उत्तमनगर येथील ‘न्यू सनराईझ सुपर मार्केट’ येथून शुक्रवारी ३३ हजार रुपयांचा गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली. तर, वडगाव बुद्रुक येथील बाबूलाल खिलेरी या व्यापाऱ्याकडे रविवारी ५४ हजारांचा पान मसाला आणि सुगंधी तंबाखू सापडली आहे. अन्न विभागाचे सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी या कारवायांविषयी माहिती दिली. अन्न सुरक्षा अधिकारी सचिन आढाव, अस्मिता टोणपे, अविनाश दाभाडे आणि रमाकांत कुलकर्णी यांनी या कारवायांमध्ये सहभाग घेतला.