गेली अनेक वर्षे रसिकांना आपल्या गायकीने आनंद देणारे ‘मेवाती’ घराण्याचे बुजुर्ग गायक पं. जसराज यांची मैफल झाली नसली, तरी हृदयसंवाद साधत त्यांनी रसिकांना जिंकून घेतले.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची गुरुवारच्या सत्राची सांगता पं. जसराज यांच्या गायनाने होणार होती. मात्र, प्रकृती अस्वास्थ्य असतानाही स्वरमंचावर आलेल्या पं. जसराज यांनी बोल ताना घेण्याऐवजी केवळ बोलणे पसंत केले. कन्या दुर्गा जसराज हिने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. रतन मोहन शर्मा, अंकिता जोशी, तृप्ती मुखर्जी, प्रीतम भट्टाचार्य, गार्गी सिद्धांता या शिष्यांनी गायनसाथ केली.
वयाच्या चौथ्या वर्षी वडील पं. मोतीराम यांच्याकडून तालीम मिळाली, अशी आठवण पं. जसराज यांनी सांगितली. मोठमोठय़ा कलाकारांना ऐकूनच माझी जडणघडण झाली. एका मैफलीमध्ये माझे गायन ऐकून ‘तुम तो सुन्नी शागीर्द हो’ अशा शब्दांत तबलानवाज उस्ताद आमीर हुसेन खाँ यांनी माझा गौरव केला होता, असे पं. जसराज यांनी सांगितले. माझी पत्नी मधुरा ही चित्रपती व्ही. शांताराम यांची कन्या. तिचा जन्म पुण्यातील. त्यामुळे माझे पुण्यावर प्रेम आहे, असेही त्यांनी सांगितले.
पं. संजीव अभ्यंकर हा माझा शिष्य पुण्याचाच आहे. त्याला तुम्ही नेहमी ऐकता. त्यामुळे आज साऱ्या शिष्यांना तुमच्यासमोर आणले आहे. त्यांनाही असेच प्रोत्साहन द्या. मला दिलेत तसेच प्रेम माझ्या शिष्यांवरही करा, असे आवाहन पं. जसराज यांनी केले.
महोत्सवात आज
– रमाकांत गायकवाड (गायन)
– सुमित्रा गुहा (गायन)
– आनंद भाटे (गायन)
– सुचेता भिडे-चापेकर (भरतनाटय़म)
– पं. अजय पोहनकर (गायन)