पंकजा मुंडे यांचा निर्धार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : निवडणुकीतील माझा पराभव हा केवळ काही काळासाठी झालेल्या फ्रॅक्चरसारखा आहे, अशा फ्रॅक्चरला फारसे जिव्हारी लावून घ्यायचे नसते. अपयश आल्यामुळे खचून न जाता विद्यार्थ्यांनी पुन्हा यशस्वी भरारी घेण्यासाठी सज्ज व्हावे, असा सल्ला राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी दिला.

स. प. महाविद्यालयाच्या पदवीप्रदान समारंभात पंकजा मुंडे बोलत होत्या. शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन, सदस्य आमदार माधुरी मिसाळ, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश पवार, प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, परीक्षा नियंत्रक डी. बी. पवार या प्रसंगी उपस्थित होते. या वेळी ८८३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

मुंडे म्हणाल्या,की २३ हजार गावांमध्ये पाण्याची सोय निर्माण केली. राज्यात मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून काम केले. शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन केल्या. जलयुक्त शिवार योजना राबविली. मात्र, मी निवडणुकीत जिंकू शकले नाही. मी का जिंकले नाही, याचे कारण माझा मुलगा विचारतो. ‘परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका सोडवतो म्हणून तुला गुण मिळतात. निवडणुकीत मी अभ्यास करते, पण प्रश्नपत्रिका इतर सोडवितात. त्यामुळे पराभव होऊ  शकतो’, असे मी त्याला सांगते. परीक्षेत एखाद्या विषयात अनुत्तीर्ण झाल्यावर छोटेसे फ्रॅक्चर होणार आहे. या आठवणी भावी वाटचालीसाठी लक्षात ठेवायच्या असतात. भविष्यात तुम्हाला यश मिळणार आहे. अपयश पचवून यश संपादन करण्याची शक्ती तुम्हाला मिळो.

अर्थसंकल्पात मराठवाडय़ाची निराशा

राज्याच्या अर्थसंकल्पात मराठवाडय़ाची निराशा झाली आहे. वॉटर ग्रीड प्रकल्पामध्ये बीड जिल्ह्य़ालाच डावलण्यात आल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली. भ्रष्टाचार रोखण्यासाठी शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने होण्याबाबतचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता. तो निर्णय या सरकारनेही कायम ठेवावा. अन्यथा निर्णयांना स्थगिती देणाऱ्या सरकारचे नामकरण अधोगतीकडे नेणारे सरकार होईल, अशी टिप्पणी त्यांनी या वेळी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde attended school function in pune zws
First published on: 08-03-2020 at 06:41 IST