उपसंचालक कार्यालयाला पोलीस संरक्षण; विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमातील महाविद्यालय मिळूनही पालक नाराज
अकरावीला केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत ५१ हजार मुलांना पहिल्या तीन पर्यायांमधील महाविद्यालय मिळूनही या वर्षीही प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यांत गोंधळाचेच वातावरण आहे. पसंतीचे महाविद्यालय मिळत नाही, असे सांगतोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालक आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात गोंधळ घातल्याने कार्यालयाला पोलीस संरक्षण देण्याची वेळ आली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीच्या चार प्रवेश फे ऱ्या झाल्या आहेत. या वर्षी अकरावीची प्रवेशक्षमता साधारण ७३ हजार होती. ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने झालेल्या चारही फे ऱ्यांमध्ये मिळून ५१ हजार ५१४ विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या महाविद्यालयांच्या पसंतीक्रमापैकी पहिल्या तीन महाविद्यालयांपैकी एकात प्रवेश मिळाला आहे. मात्र हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश न मिळालेल्या, महाविद्यालय मिळूनही त्यात प्रवेश निश्चित न केल्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडलेल्या आणि ऑनलाइन प्रवेशाची माहितीच न मिळाल्यामुळे प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाच्या कार्यालयात गुरुवारी गर्दी केली. मिळालेले महाविद्यालय बदलून मिळावे, दूरचे महाविद्यालय मिळाले आहे, प्रवेशच मिळाला नाही, अशी कारणे घेऊन गुरुवारी शेकडो पालक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात जमले होते. कार्यालयाच्या बाहेर आंबेडकर रस्त्यापर्यंत गर्दी पोहोचल्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला. हवालदिल झालेले पालक आणि विद्यार्थी, विभागातील कर्मचाऱ्यांचा थंड प्रतिसाद आणि संघटनांकडून दिली जाणारी चिथावणी यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी शिक्षण विभागांत गोंधळ झाला. महाविद्यालय बदलून मिळावे म्हणून गोंधळ घालणाऱ्या काही पालकांनी कार्यालयात आत्महत्येच्याही धमक्या दिल्या. शिक्षण विभागीय कार्यालयातील गर्दी आणि पालकांचा गोंधळ हाताबाहेर गेल्यामुळे कार्यालयाला पोलीस संरक्षण देण्याची वेळ आली आहे.
अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना वालीच नाही
प्रवेश मिळालेला असूनही तो न घेतल्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडले आहेत. या विद्यार्थी आणि पालकांच्या गोंधळात खरेच अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना वालीच नाही. बाहेरगावाहून आलेल्या आणि ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची माहितीच नसलेल्या विद्यार्थ्यांची चूक नसतानाही मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. वाशिम येथून पुण्यात अकरावीला प्रवेश घेण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्यांला ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया काय असते, केंद्रीय पद्धतीने प्रवेश कसे होतात याची काहीच माहिती नव्हती. प्रवेश हवा असेल तर महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घ्यायचा एवढीच माहिती असलेल्या या विद्यार्थ्यांला प्रवेश प्रक्रिया झाल्यावर या संबंधीची माहिती मिळाली. प्रवेश कसा घ्यायचा अशी महाविद्यालयाकडे चौकशी करून तोही उपसंचालक कार्यालयांत दाखल झाला. सलग पाच दिवस कार्यालयांत खेटे मारूनही ऑनलाइन अर्ज कसा भरायचा याची माहितीही किंवा माहितीपुस्तकही मिळू शकलेली नाही.
पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळालेले विद्यार्थी
- पहिल्या पसंतीचे महाविद्यालय – २९०००
- दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय – १३, ७९०
- तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय – ८, ७२४