पुणे : करोना प्रादुर्भावामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा गेल्या वर्षी रद्द करण्यात आली. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचा अंशत: परतावा करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला असून, दहावीच्या विद्यार्थ्यांना ५९ रुपये आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ९४ रुपये परत करण्यात येणार आहेत. त्यासाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचा तपशील सादर करण्याची सूचना केली आहे.
राज्य मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीची आणि मार्च-एप्रिलमध्ये दहावीची परीक्षा घेतली जाते. मात्र २०२१ची परीक्षा करोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. मात्र त्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज करून परीक्षा शुल्क भरले होते. परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी करण्यात येत होती. तसेच शुल्क परताव्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती.
शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांची माहिती https://feerefund.mh-ssc.ac.in या दुव्याद्वारे आणि शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती https://feerefund.mh-hsc.ac.in या दुव्याद्वारे भरणे आवश्यक आहे.
गेल्या वर्षी राज्य मंडळाकडून प्रश्नपत्रिका तयार करून त्यांची छपाई, प्रश्नपत्रिका विभागीय मंडळाकडे पोहोचवणे, तर उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रांवर पोहोचवणे आदी सर्व व्यवस्था झाली होती. तसेच अकरावीच्या प्रवेशांसाठीच्या सीईटीचीही तयारी करण्यात आली होती. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आल्या, प्रमाणपत्रेही दिली जाणार आहेत. त्यामुळे या सर्व व्यवस्थेसाठी केलेला खर्च वजा जाता विद्यार्थ्यांना परतावा दिला जाईल. – शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ