बंडगार्डन पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस कर्मचारी दिगंबर लक्ष्मण घोरपडे याच्या मदतीने पुण्यातून बनावट कागदपत्राच्या आधारे पासपोर्ट काढणाऱ्या पाकिस्तानी महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला मुंबई येथील नातेवाइकांना भेटण्यासाठी येत असताना अमृतसर पोलिसांनी ताब्यात घेऊन बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या ही आता चौदा झाली असून आतापर्यंत ९१ बनावट पासपोर्ट बनविण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यापैकी ६६ जणांवर ‘लूकआऊट’ नोटीस बजविण्यात आली आहे. त्याआधारेच या महिलेला अटक केली आहे.
गुलजार अब्दुल मलीक मंजीयानी (वय ४७, रा. पाकिस्तान) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस निरीक्षक एस. बी. निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजीयानी ही मूळची मुंबईची राहणारी आहे. तिने २००९ साली पुण्यातील लष्कर भागातील पत्ता दाखवून बनावट पासपोर्ट काढला होता. साडेतीन वर्षांपूर्वी पाकिस्तानात राहणाऱ्या नात्यातील मुलाबरोबर तिचा विवाह झाला होता. या प्रकरणात बनावट पासपोर्ट काढणाऱ्यांचे पत्ते आढळून न आलेल्यांच्या विरुद्ध ‘लूकआऊट’ नोटीस बजावण्यात आली आहे. मंजीयानी चार दिवसांपूर्वी मुंबईतील नातेवाइकांना रेल्वेने भेटण्यासाठी येत होती. त्या वेळी अमृतसर पोलिसांना तिच्याकडे हा पासपोर्ट मिळून आला. त्या वेळी तिला ताब्यात घेऊन बंडगार्डन पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार तिला अटक करण्यात आली आहे. तिला न्यायालयात हजर केले असता ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
बंडगार्डन पोलीस ठाण्याचा कर्मचारी असलेल्या घोरपडे याने पारपत्र पडताळणी न करताच अनेकांना परवाने दिल्याचे प्रकरण २०११ मध्ये उघडकीस आले होते. त्याबरोबरच कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमचा साथीदार साजीत बाटलीवाला याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर त्यानेही पुण्यातूनच बनावट कागदपत्राच्या आधारे पासपोर्ट काढल्याचे आढळून आले होते. या प्रकरणात आतापर्यंत मॉडेल जिया चोपरा, नृत्यांगना वेदिका शिवसागर, अरविंद भट, अभय लोखंडे, रजनिश गुजर यांच्याबरोबर तेरा जणांस अटक केली आहे. याप्रकरणी ऑगस्ट २०११ मध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून त्यामध्ये ९१ जणांनी बनावट पासपोर्ट काढल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passport arrested police lookout
First published on: 29-07-2014 at 03:17 IST