महापालिकेतर्फे दिला जाणारा यंदाचा पठ्ठे बापूराव पुरस्कार कांताबाई तुकाराम खेडेकर (सातारकर) यांना जाहीर झाला असून मंगळवारी (२८ मे) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खेडेकर यांना पुरस्कार प्रदान केला जाईल.
महापौर वैशाली बनकर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. लोकनाटय़ व लोककला क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीबद्दल महापालिकेतर्फे प्रतिवर्षी पठ्ठे बापूराव पुरस्कार दिला जातो. स्मृतिचिन्ह आणि एक्कावन्न हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महापालिकेने १९९५ मध्ये हा पुरस्कार सुरू केला असून पुरस्कार प्रदान कार्यक्रमात लोकनाटय़ क्षेत्रातील ज्येष्ठ सहायक कलाकार तसेच उदयोन्मुख पाच कलाकारांनाही स्मृतिचिन्ह आणि अकरा हजार रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविले जाते. यंदा नृत्यांगना जयमाला प्रकाश इनामदार, गायिका ममताबाई शंकर यादव, हार्मोनियम वादक शेख हसन ऊर्फ हिरो परभणीकर, तबलावादक मदन खंडागळे आणि ढोलकीवादक राजकुमार संभाजी गायकवाड यांना पुरस्कार देऊन गौरविले जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
हा पुरस्कार प्रदान समारंभ मंगळवारी दुपारी तीन वाजता महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार असून डॉ. भास्करराव खांडगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल.