आकुर्डीतील फोर्ब्स मोटर्स कामगारांच्या गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित
असलेला वेतनवाढ करार व अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत विद्यमान ४४० कामगारांना १४ हजार रूपयांची वेतनवाढ देण्याचा निर्णय झाला.
मुंबईत सह्य़ाद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री व पवारांसह कंपनीचे मालक अभय फिरोदिया, कामगारमंत्री प्रकाश मेहता, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय देशमुख, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघेरे, दत्ता साने, कामगार प्रतिनिधी भरत शिंदे, हमीद शेख आदी उपस्थित होते. महिन्यापूर्वी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. तेव्हा फिरोदिया तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक लावण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. त्यानुसार, मुंबईत ही बैठक झाली. या वेळी विद्यमान ४४० कामगारांना १४ हजार रूपयांची वेतनवाढ देण्याचा निर्णय व्यवस्थापन व कामगार प्रतिनिधींनी मान्य केला. विद्यमान व निवृत्त झालेल्या कामगारांच्या फरकाची रक्कम औद्योगिक न्यायालयात जो निर्णय होईल, त्यानुसार दिली जाईल, यावर शिक्कामोर्तब झाले.
गेल्या १२ वर्षांपासून हा प्रश्न रखडला आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी सातत्याने आंदोलने केली. कामगारांचे कुटुंबीयही आंदोलनात उतरले. कामगारांच्या कुटुंबातील महिला उपोषणाला बसल्या. तथापि, व्यवस्थापनाकडून दाद मिळत नव्हती. कामगारमंत्र्यासह स्थानिक आमदार-खासदारांनी प्रयत्न केले. तथापि, त्यांना यश येत नव्हते. पवारांच्या मध्यस्थीने ही बैठक झाली, त्यात तोडगा निघाल्याने आंदोलकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2015 रोजी प्रकाशित
आकुर्डीतील ‘फोर्ब्स मोटर्स’च्या आंदोलनाला यश
आंदोलकांच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. तेव्हा फिरोदिया तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक लावण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली होती.
Written by दिवाकर भावे

First published on: 04-11-2015 at 03:26 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pawar and phadanvis fulfilled demands of forbes motor employees