पिंपरी महापालिकेच्या ६०० मिळकतींमध्ये करण्यात आलेली बांधकामे विनापरवाना असून सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याची लेखी कबुली पालिकेने दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कायद्याचा बडगा दाखवणाऱ्या पालिकेची अवस्था ‘दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान.’ अशी असल्याचे उघड झाले आहे.
शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे यांनी पिंपरी पालिकेच्या किती मिळकती आहेत, त्यापैकी किती मिळकतींच्या बांधकामांना परवानगी आहे व या मिळकतींना सुरक्षा व्यवस्था कशी दिली आहे, असे प्रश्न प्रशासनाला विचारले होते. त्यास भूमीजिंदगी विभागाच्या वतीने लेखी उत्तर देण्यात आले असून त्यामुळे सगळाच भंडाफोड झाला आहे. महापालिकेच्या ६५६ पैकी केवळ ४४ मिळकतींना परवानगी असून जेमतेम १३८ मिळकतींनाच सुरक्षा व्यवस्था दिल्याची कबुली देण्यात आली आहे.
मनपा कार्यालये २४, व्यापारी संकुले २९, उपाहारगृह १२, सांस्कृतिक केंद्रे व समाजमंदिरे ५६, भाजीमंडई २४, शाळा इमारती १०८, कर्मचारी निवासस्थाने १४५, उद्यानातील बांधकामे १३१, व्यायामशाळा ६९, पाण्याची टाकी ३५, हॉस्पिटल २९, क्रीडा संकुले २७, स्मशानभूमी २४, तलाव ११, विरंगुळा केंद्र ४, कोंडवाडे ४, धोबीघाट ४, प्रेक्षागृह ३, मैलाशुध्दीकरण केंद्र ३ आणि इतर १४ अशा ६५६ मिळकती भूमीिजदगी विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी केवळ ४४ मिळकतींच्या बांधकामांसाठी परवानगी घेण्यात आली असून उर्वरित बांधकामे विनापरवाना आहेत. तर, १३६ मिळकतींना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली असून आठ इमारतीत श्वानपथक नियुक्त केलेले आहे. अन्य मिळकती मात्र रामभरोसे असल्याचे पालिकेने मान्य केले आहे.