पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने टाकाऊतून टिकाऊ (वेस्ट टू बेस्ट) संकल्पनेअंतर्गत पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानात ‘वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क’ उभारण्यात येत आहे. त्यामध्ये विविध विभागांतील टाकाऊ भंगार वस्तूंपासून या पार्कमध्ये जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृतींसह १७ ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती तयार केल्या जात आहेत. या उद्यानाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच ते शहरवासीयांसाठी खुले केले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका भंगार व टाकाऊ साहित्यातून ‘वंडर वर्ल्ड’ ही संकल्पना राबवित आहे. उद्याने अधिक आकर्षक करण्यासाठी पाणीपुरवठा व कार्यशाळा विभागांतील टाकाऊ लोखंडी साहित्यातून आकर्षक कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत. पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानात साकारण्यात येत असलेल्या ‘वर्ल्ड वंडर’ पार्कचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पार्कसाठी ११ कोटी नऊ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याचा ७५ टक्के खर्च महापालिका व २५ टक्के खर्च ठेकेदाराकडून केला जात आहे. या उद्यानाचे संचालन, देखभाल व दुरुस्ती संबंधित ठेकेदार करणार आहे. या उद्यानास प्रवेश शुल्क असणार आहे. त्यातून उपलब्ध झालेले उत्पन्न महापालिकेच्या उद्यान विभागास मिळणार आहे.
दरम्यान, शहरातील उद्यानांमध्ये ‘वेस्ट टू बेस्ट’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात डायनासोर पार्क साकारण्यात आले. त्यात डायनासोर प्रजातीच्या १४ प्रतिकृती बसविण्यात आल्या आहेत. त्याची माहिती इंग्रजी व मराठीत दर्शविण्यात आली आहे. लिनिअर उद्यानाच्या कडेला जुन्या काळातील वाहनांच्या आठ प्रतिकृती लावण्यात आल्या आहेत. संभाजीनगर, चिंचवड येथील शिव शाहू शंभू उद्यानात ‘बॉलिहूड’ पार्क साकारले जात आहे. त्यात हिंदी व मराठी चित्रपटातील प्रसिद्ध प्रसंगावर आधारित कलाकृती तयार केल्या जात आहेत.
१७ ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती
टाकाऊ वस्तूंपासून उभारण्यात येत असलेल्या पिंपळे सौदागर येथील उद्यानात १७ ऐतिहासिक वास्तूंची प्रतिकृती असणार आहेत. ताजमहल, आयफेल टॉवर, बुर्ज खलिफा, लिनिंग टॉवर ऑफ पिसा, सिडनी ऑपेरा हाऊस, अंजठा कव्ह, ला सागराडा फॅमिलीया, चिचेन इतजा, पिरॅमिड ऑफ गिझा, पेट्रा ऑफ जॉर्डन, कोलोसियम ऑफ रोम, बिग बेन ऑफ लंडन, अकोर वट ऑफ कंबोडिया, हंपी चारियट, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, ट्रेव्ही फाउंटन आणि माऊंट रश्मोर आदी जगप्रसिद्ध कलाकृती साकारण्यात आल्या आहेत.
उद्यानांतील नव्या संकल्पनेवरील आकर्षक सुशोभीकरणामुळे शहर पर्यटनास चालना मिळणार आहे. टाकाऊ वस्तूमधील साकारलेली ही संकल्पना पर्यावरणपूरक असून, शहराच्या सौंदर्यात भर घालणारी आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले. या उद्यानामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे. ‘वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क’चे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. लवकरच काम पूर्ण करून ते शहरवासीयांसाठी खुले करण्याचे नियोजन असल्याचे महापालिकेचे सह शहर अभियंता मनोज सेठीया यांनी सांगितले.