पिंपरी : शहरातील अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांच्या विरोधात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी धडक कारवाई सुरू केली असताना, महापौर माई ढोरे यांनी मात्र करोनाचे कारण देऊन ही कारवाई थांबवण्याचे आदेश गुरुवारी पालिका सभेत दिले. करोनामुळे आधीच नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यात अशा कारवाईची भर नको, अशी भूमिका महापौरांनी मांडली.

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी पालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांच्या विरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे. कोणताही राजकीय दबाव न जुमानता आयुक्तांच्या आदेशानुसार ठिकठिकाणी ही कारवाई सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयुक्तांनी सुरू केलेल्या या कारवाईचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. एरवी इतर विषयांवर एकमत न होणाऱ्या राजकीय पक्षांचे ही कारवाई थांबवण्याबाबत एकमत आहे. तथापि, सुरू असलेल्या कारवाई मोहिमेवर आयुक्त ठाम आहेत.

पालिकेतील सत्तारूढ भाजप आणि आयुक्तांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शीतयुद्धाचे एक कारण सध्या सुरू असणारी कारवाई देखील आहे. निवडणूक तोंडावर असताना भाजपच्या विरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण व्हावा, यासाठी राष्ट्रवादीच्या शीर्षस्थ नेत्यांच्या सांगण्यावरून आयुक्तांनी जाणीवपूर्वक ही कारवाई सुरू केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी यापूर्वीच केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर, गुरुवारच्या सभेत सदस्यांनी या कारवाईचा विषय उपस्थित केला असता, ही कारवाई चुकीच्या पद्धतीने सुरू आहे, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. त्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्दय़ांचा संदर्भ देऊन महापौर म्हणाल्या की, आरक्षणांवर किंवा रस्त्यांवर अतिक्रमणे झाली असल्यास त्यावर जरूर कारवाई करावी. मात्र, इतर ठिकाणी तूर्त कारवाई नको. करोनामुळे सर्वसामान्य नागरिक आधीच पोळून निघाला आहे. त्यात आणखी भर नको. अशाप्रकारची बांधकामे सुरू असतानाच ती थांबवणे गरजेचे आहे. मात्र, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते आणि नंतर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. असे होता कामा नये.