पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर पाच दिवसांत केवळ दोन सूचना व हरकती आल्या आहेत. एक सूचना प्रभाग क्रमांक आठ आणि दुसरी सूचना प्रभाग क्रमांक २१ बाबत आहे. हरकती व सूचना चार सप्टेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. मतदान केंद्राच्या निश्चितीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासनाने महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर २२ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचनेचा नकाशा प्रसिद्ध केला. महापालिका भवनाच्या आवारात तसेच, सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या आवारात नकाशे व माहिती प्रसिद्ध केली आहे. नागरिक नकाशे व माहिती पाहताना दिसतात. मात्र, फेब्रुवारी २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना असल्याने हरकतींचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. प्रारूप प्रभाग रचनेबाबत पाच दिवसांत केवळ दोन हरकती प्राप्त झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक आठचे नाव इंद्रायणीनगर-संतनगर असे असावे, अशी सूचना हनुमंत लांडगे यांनी केली आहे. प्रभाग क्रमांक २१ मध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असल्याने तो प्रभाग राखीव करावा. त्याप्रमाणे या प्रभागाची रचना करावी, अशी सूचना भीम संग्राम सामाजिक संघटनेचे राहुल वडमारे यांनी केली आहे.
मतदान केंद्राची निश्चिती करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता, (स्थापत्य, विद्युत) यांची नियुक्ती केली आहे. उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांची सेक्टर अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत नियुक्ती कायम ठेवली जाणार आहे. खासगी इमारतीमध्ये मतदान केंद्र, एका इमारतीमध्ये पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र असल्यास अधिकाऱ्यांनी इमारतीच्या ठिकाणी जाऊन तपासणी करावी. १५ दिवसांत निवडणूक प्रभागनिहाय मतदान केंद्र निश्चितीचा अहवाल सादर करण्याचा आदेश महापालिका निवडणूक विभागाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिला आहे.
शहरात २३०० मतदान केंद्रे
महापालिकेची निवडणूक २०११ च्या १७ लाख २७ हजार ६९२ या लाेकसंख्येप्रमाणे हाेणार आहे. तेवढीच मतदारसंख्या अपेक्षित धरून मतदान केंद्र निश्चित करण्याचे नियाेजन करण्यात येत आहे. २०१७ च्या निवडणुकीमध्ये एक हजार ६०८ मतदान केंद्रे हाेती. आगामी निवडणुकीसाठी अंदाजे दोन हजार ३०० इतकी मतदान केंद्रे अपेक्षित आहेत. एका मतदान केंद्रावर ७०० ते ८०० मतदार असणार आहेत.
प्रभाग रचनेवर महापालिका भवनातील तळमजल्यावरील निवडणूक कार्यालयात, तसेच, सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांत हरकती व सूचना स्वीकारण्यात येत आहेत. आतापर्यंत दोनच हरकती आल्या आहेत. मतदान केंद्रनिश्चितीची कार्यवाही सुरू केली आहे.
अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका