पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने आकुर्डीत उभारलेल्या खाद्यपदार्थ केंद्रातील ४९ गाळ्यांचे महिला बचत गटांना वाटपासाठी ई-लिलाव घेतला. या केंद्राला ‘सखी आंगण’ नाव दिले असून, त्याचे प्रतीकचिन्ह (लोगो) निश्चित केले आहे. या केंद्राचे संचालन शहरातील महिला बचत गटांमार्फत केले जाणार आहे. महिला बचत गटांमार्फत खाद्यपदार्थ, हस्तकला आणि वस्त्रनिर्मिती व्यवसायाच्या विक्रीतून दरमहा दहा लाखांहून अधिक उलाढाल अपेक्षित असल्याचे समाजविकास विभागाने सांगितले.
समाज विकास विभागामार्फत महिला व बालकल्याण योजनेंतर्गत आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात खाद्यपदार्थ विक्री केंद्रे उभारण्यात आली आहेत. या आधुनिक इमारतीतील सर्व ४९ गाळे महिला बचत गटांना खाद्यपदार्थ विक्री व व्यवसायासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी भाडेकराराने ई-लिलावाद्वारे गाळे दिले जाणार आहेत. प्रतिगाळा १५ हजार १०० ते ३२ हजार रुपयांपर्यंत लिलाव दर नोंदविले. एकूण ४९ पैकी दोन गाळे अपंग महिला बचत गटांसाठी, एक गाळा तृतीयपंथी गटासाठी, एक गाळा करोना योद्धा महिला गटासाठी, दोन गाळे आदिवासी गटांसाठी, तीन गाळे दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत गटांसाठी आणि उर्वरित ४० गाळे पीसीएमसी सक्षम अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटांसाठी देण्यात आले.
असे घडले केंद्र
खाद्यपदार्थ केंद्राच्या सुशोभीकरण आणि जाहिरातीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विशेष हॅकेथॉन स्पर्धा घेण्यात आली. डिझायनिंग आणि मार्केटिंग क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कल्पकतेतून इमारतीचे आकर्षक सुशोभिकरण केले. खाद्यपदार्थ केंद्राला ‘सखी आंगण’ हे नाव दिले आहे. शहराच्या ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडविणारे, तसेच महिलांसाठी कार्य केलेल्या समाजसुधारकांची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.
या केंद्राद्वारे महिलांना खाद्यपदार्थ, हस्तकला, घरगुती वस्तू आणि वस्त्रनिर्मिती यांसारख्या विविध व्यवसायांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यातून महिलांना स्थिर उत्पन्नाचे व्यासपीठ मिळून शहराच्या अर्थचक्रात त्यांचा सहभाग वाढेल. दरमहा दहा लाखांहून अधिक उलाढाल अपेक्षित असून, महिलांचे कौशल्य, व्यवस्थापन क्षमता आणि आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी व्यक्त केला.
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण करण्यासाठी ‘सखी आंगण’ हा उपक्रम मोठी भूमिका बजावणार आहे. महिला बचत गटांना व्यवसायाचे व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या कौशल्याला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न महापालिकेमार्फत करण्यात आला आहे. हा उपक्रम महिलांच्या विकासाच्या प्रवासात परिवर्तन घडवणारा ठरेल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
