• आतापर्यंत ३० हजार महिलांना १३ कोटींचे वाटप
  • यापुढे १० हजारांचे अर्थसाहाय्य

पिंपरी पालिकेच्या वतीने विधवा व घटस्फोटित महिलांना देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्य रकमेत चार हजारांनी वाढ करण्यात आली असून आता ही रक्कम प्रत्येकी १० हजार रुपये राहणार आहे. पालिकेने १९९५ पासून आतापर्यंत ३० हजार २०४ महिलांना अशाप्रकारे अर्थसाहाय्य केले असून त्यासाठी १३ कोटी ६२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात, त्याअंतर्गत विधवा व घटस्फोटित महिलांना अर्थसाहाय्य देण्याची योजना वर्षभर राबवली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत विधवा तसेच घटस्फोटित महिलांना एकदाच सहा हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येत होते. मात्र, ही रक्कम खूपच अपुरी असल्याने यंदापासून त्यामध्ये चार हजारांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, यापुढे ही रक्कम १० हजार रुपये करण्यात आली आहे. त्यानुसार, या आर्थिक वर्षांत १८९७ अर्ज प्राप्त झाले असून त्यातील ८१५ अर्ज पात्र ठरले आहेत. त्यांच्यासाठी खर्च होणाऱ्या ८१ लाख ५० हजार रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

पिंपरी पालिकेच्या वतीने १९९५-९६ पासून अशाप्रकारे अर्थसाहाय्य देण्यास सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात पाच हजार रुपये दिले जात होते. काही वर्षांनंतर ही रक्कम सहा हजारांपर्यंत वाढवली. आता ती रक्कम दहा हजार रुपये करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या प्रवासात २००६-०७ या वर्षांत ३,४६२ आणि २००८-०९ या वर्षांत ३,८६० तसेच २०१०-११ या वर्षांत ४,०६२ असे सर्वाधिक लाभार्थी होते. तर, २००२-०३ या वर्षांत सर्वात कमी असे तीनच लाभार्थी होते. याशिवाय, २०००-०१ आणि २००९-१० या आर्थिक वर्षांत या अर्थसाहाय्यांचे वाटप झाले नाही. काही तांत्रिक अडचणी उद्भवल्याचे कारण सांगितले जाते.

पिंपरी पालिकेकडून उपयुक्त अशा विविध योजना राबवल्या जातात. त्याअंतर्गत विधवा व घटस्फोटितांसाठी ही योजना असून आतापर्यंत ३० हजारांहून अधिक लाभार्थीनी लाभ घेतला आहे.

– संभाजी ऐवले, समाजविकास अधिकारी, पिंपरी पालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc helping to widows divorced women
First published on: 23-03-2018 at 05:13 IST