पिंपरी : पावसाळ्यात शहरात अत्यावश्यक कामे वगळता रस्तेखोदाई करण्यास १५ मे नंतर बंदी असतानाही महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन करून भोसरी, एमआयडीसीत विद्युत केबल टाकण्यासाठी रस्तेखोदाई करणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाला ८० लाख ९३ हजार रुपये दंडाची नाेटीस दिली आहे. हा दंड भरण्यासाठी संबंधित व्यावसायिकाला पाच दिवसांची मुदत दिली. मात्र, मुदत संपूनही अद्याप दंड भरला नाही.
पावसाळा सुरू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात रस्ते आणि पदपथ खोदकामास १५ मे ते १५ ऑक्टोबरपर्यंत बंदीचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. असे असतानाही शहरातील अनेक भागात खोदाई केली जाते. खोदाईमुळे रस्त्यांवर खड्ड्यांची भर पडते. संबंधित बांधकाम व्यावसायिकाला रस्ते खोदाईसाठी ३० डिसेंबर २०२४ पासून ३० जानेवारी २०२५ पर्यंत परवानगी देण्यात आली होती. मात्र, भोसरीतील लांडेवाडी रस्त्यावर एमआयडीसी चौकात केबल टाकण्यासाठी पदपथ खोदण्यात आला. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेने तातडीने खोदकाम थांबविले. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यात २३७ मीटर लांबीची खोदाई केल्याचे आढळून आले.
याप्रकरणी ८० लाख ९३ हजार ८६८ रुपये इतक्या दंडात्मक कारवाईची नोटीस संबंधितांना दिली. नोटीस मिळाल्यानंतर पाच दिवसांत महापालिकेच्या कोषागारात दंड भरून त्याची पावती स्थापत्य विभागाकडे सादर करावी. उर्वरित खोदाईचे काम स्थापत्य विभागाची पूर्वपरवानगी घेऊनच करण्यात यावे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा नोटिशीमध्ये देण्यात आला आहे. मात्र, संबंधित बांधकाम व्यावसायिकाने अद्याप दंडाची रक्कम भरली नाही. बांधकाम परवानगी विभागाला पत्र देऊन दंड भरून घेतल्याशिवाय त्या प्रकल्पास भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, असे कळविल्याचे उप अभियंता महेंद्र देवरे यांनी सांगितले.
पाणीपुरवठा, मलनिस्सारण व विद्युतविषयक अत्यावश्यक कामांसाठी खोदाईला परवानगी दिली जाते. त्याव्यतिरिक्त पावसाळ्यात कोणालाही परवानगी दिली जात नाही. खोदाई करू नये अन्यथा नियमानुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल. भोसरी एमआयडीसीत खोदाई सुरू असल्याचे लक्षात येताच काम थांबवून संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. – मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका