पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिका प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली. खड्ड्यांकडे, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे आणि खड्डे बुजविताना दर्जा न ठेवणाऱ्या महापालिकेच्या २६ कनिष्ठ अभियंत्यांना शहर अभियंत्यांनी नोटीस दिली आहे. दरम्यान, शहरात ४११ खड्डे असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने यावर्षीपासून खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. या अंतर्गत ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ हे ॲप विकसित करण्यात आले. या ॲपमुळे खड्ड्यांची तक्रार नोंदवणे आणि त्या तक्रारींचे निराकरण करण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ करण्यात आली आहे. ॲपवरील तक्रारींकडेही कनिष्ठ अभियंते दुर्लक्ष करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शहरातील विविध भागातील रस्त्यांवर एक हजार ८७५ खड्डे पडले होते. त्यापैकी डांबर, काेल्ड मिक्सने ६५४, खडीने ७७, जीएसबीने ५७०, पेव्हिंग ब्लॉकने १४, सिमेंट काँक्रीटने १८७ असे एक हजार ४६४ खड्ड्यांची दुरूस्ती केली आहे. तर सध्यःस्थितीत शहरात केवळ ४११ खड्डे असल्याचा दावा महापालिका प्रशासनाचा आहे. दापोडी ते निगडी समतल विलकामध्येही खड्डे पडले आहेत.
‘पॉटहोल मॅनेजमेंट’ या ॲपवरील तक्रारी आणि खड्डे दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणे, नियमानुसार आणि खड्डे बुजविताना दर्जा न ठेवणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांना चांगलेच भाेवले आहे. यामध्ये ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातील दोन, ‘ब’ चार, ‘क’ सात, ‘ड’ चार, ‘इ’ एक, ‘फ’ मध्ये तीन, ‘ग’ मधील एक आणि ‘ह’ मध्ये चार अशा २६ अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या सर्व अभियंत्यांना नोटीस देण्यात आली आहे. खड्डे का बुजवले नाहीत. बुजवलेले खड्ड्यांची काही दिवसांतच नादुरुस्ती का झाली? याबाबत लेखी खुलासा मागवण्यात आला आहे.
महामेट्रोला पत्र
निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापासून चिंचवडपर्यंत महामेट्रोकडून मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेत. वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. त्या मार्गावरील खड्डे तातडीने दुरुस्त करावेत. वाहतूक मदतनीस नियुक्त करण्याबाबतचे पत्र महापालिकेने महामेट्रोला दिले आहे.
शहरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. कामामध्ये कसूर केल्याने कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस दिली आहे. तीन दिवसांमध्ये लेखी खुलासा मागवण्यात आला आहे. समाधानकारक खुलासा नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.