पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने मालमत्ता कर थकबाकी नसलेला दाखला घर बसल्या मिळावा यासाठी मार्च २०२२ पासून ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे. त्याचा नागरिकांना फायदा होत आहे. २०२२ पासून ६४ हजार नागरिकांनी घर बसल्या थकबाकी नसल्याचा दाखला घेतला आहे.

शहरातील नागरिकांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागत होता. कार्यालयात जावे लागत असल्यामुळे नागरिकांना वेळ आणि श्रमाचा अपव्यय होत होता. ही गैरसोय दूर करण्यासाठी कर आकारणी विभागाने महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे.

२०२२ ते जुलै २०२५ पर्यंत एकूण ६४ हजारांहून अधिक नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने थकबाकी नसल्याचा दाखला घेतला आहे. ही सेवा सुरू झाल्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आता ते घरबसल्या विना शुल्क दाखला डाउनलोड करू शकतात, असे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

दाखला काढण्याची प्रक्रिया

महापालिकेच्या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील ‘नागरिक’ या पर्यायावर क्लिक करावे आणि ‘मालमत्ता कर विभाग’ उघडावा, त्यानंतर मालमत्तेला जोडलेला मोबाईल क्रमांक किंवा मालमत्ता क्रमांक टाका. त्यानंतर मोबाईलवर एक ‘ओटीपी’ येईल. ओटीपी टाकाल्यावर, ‘कर थकबाकीदार नसल्याचा दाखला’ असा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर दाखला डाउनलोड होईल.

महापालिकेच्या कामकाजात डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून नागरिकांना घरबसल्या सेवा दिल्या जात आहेत. कर विभागाने सुरू केलेली थकबाकीदार नसल्याच्या ऑनलाइन दाखल्याची सुविधा हा त्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. नागरिकांचा वेळ वाचावा, त्यांना कोणतीही अडचण न येता आवश्यक कागदपत्रे सहज मिळावीत, हा याच उद्देश आहे. प्रदीप जांभळे अतिरिक्त आयुक्त, पिंपरी- चिंचवड महापालिका