पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या सेवा रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाई केली. पवना नदी पुलापासून मुळा नदी पुलापर्यंत सात किलोमीटर लांबीच्या मुख्य महामार्गालगतच्या दोन्ही बाजूंच्या २४ मीटरपर्यंतच्या सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून एनएच ४८ मुंबई-बंगळुरू महामार्ग जातो. महामार्गाच्या बाजुने असणारा सध्याचा रस्ता १२ मीटर रुंद आहे. या रस्त्याचा १२ मीटर विस्तार करून एकूण रुंदी २४ मीटर करण्यात येणार आहे. सेवा रस्त्यालगत अतिक्रमणे झाली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.

महापालिकेने ११० बांधकामांना धारकांना नोटीस दिल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत मुंबई-बंगळुरू महामार्ग रुंदीकरणाला अडथळा ठरणारे मुकाई चौक ते पवना नदी या दरम्यानचे ३२ हजार चौरस फुट क्षेत्रफळावरील अनधिकृत पत्राशेड व बांधकामाचे अतिक्रमण पाडण्यात आले.

पुन्हा अतिक्रमण केल्यास कडक कारवाई

या कारवाईमुळे मुंबई-बंगळुरू महामार्गालगतचे सेवा रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहेत. या सेवा रस्त्यांवर पुन्हा कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण केल्यास कडक कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे.