पुणे : व्रतवैकल्यांच्या श्रावण मासात बिहार, मध्य प्रदेशातून होणारी शेंगदाण्याची आवक काही दिवसांपासून घटत असून ऐन श्रावणात शेंगदाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी आणि पुरवठय़ात तफावत असल्याने त्याच्या दरातही वाढ झाली आहे. साबुदाणा दरातील तेजीही कायम असल्याने श्रावणातील उपवास महागडा ठरत आहे.

श्रावणात शेंगदाणा आणि साबुदाण्याच्या मागणीत मोठी वाढ होते. बाजारात नवीन शेंगदाण्याची आवक होण्यास आणखी काही काळ लागणार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन महिने शेंगदाण्याचे दर तेजीत राहणार आहेत. गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहारमधून शेंगदाण्याची आवक होते. गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेश, बिहारमधून होणारी शेंगदाण्याची आवक कमी होत चालली आहे. गुजरातमधील शेंगदाण्याची आवक थांबली आहे. शेंगदाण्याचा नवीन हंगाम सुरू होण्यास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत शेंगदाण्याची आवक कमी होत असून बाजारात शेंगदाण्याचा तुटवडा जाणवत आहे, अशी माहिती मार्केटयार्डातील शेंगदाणा, साबुदाण्याचे व्यापारी आणि दी पूना मर्चंट्स चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा यांनी दिली.

दरवर्षी शेंगदाण्याचा हंगाम जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात संपतो. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात बाजारात शेंगदाण्याचा तुटवडा जाणवतो. श्रावणातील उपवासासाठी शेंगदाण्याच्या मागणीत मोठी वाढ होते. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने सध्या बाजारात शेंगदाण्याचा तुटवडा जाणवत आहे. घाऊक बाजारात घुंगरू शेंगदाण्याचे किलोचे दर ९० ते ९३ रुपये, स्पॅनिश शेंगदाण्याचे दर १०० ते ११० रुपये असल्याचे लोढा यांनी सांगितले.

किरकोळ दर (एक किलो)

शेंगदाणा- १०० ते १२०

साबुदाणा- ५५ ते ७०

भगर- १०० ते १२०

शेंगदाणा दरात तेजी साबुदाणा ५० रुपयांवर

श्रावणात साबुदाण्याच्या मागणीत मोठी वाढ होते. साबुदाणा दरातील तेजी कायम असून घाऊक बाजारात एक किलो साबुदाण्याचे दर ४७ ते ५० रुपये आहेत. चांगल्या प्रतीच्या साबुदाण्याचे दर ५१ ते ५३ रुपये आहेत, भगरीचे दर स्थिर आहेत, असे साबुदाणा शेंगदाणा व्यापारी अशोक लोढा यांनी नमूद केले.