दत्ता जाधव, लोकसत्ता

पुणे : भाज्या आणि किराणासह साऱ्याच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढलेल्या असताना उपवासाचे सारे जिन्नसही महागले आहे. शेंगदाणे, साबूदाणा, वरई, राजगिऱ्याच्या दरात सरासरी ४-५ रुपयांची वाढ झाली असून त्यामुळे आषाढी एकादशीचा उपवास यंदा अधिक खर्चिक ठरणार आहे.

साबूदाण्याच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ होऊन प्रति क्विंटलचे दर ५६०० रुपयांवर गेले आहेत. किरकोळ विक्रीच्या दरात सरासरी दोन रुपयांची वाढ होऊन प्रति किलोचे दर ५८ रुपयांवर जाणार आहेत. वरईच्या (भगर) दरात प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपयांनी वाढ होऊन प्रति क्विंटलचे दर ११००० ते ११५०० रुपयांवर गेले आहेत. वरईच्या किरकोळ विक्रीत दोन ते तीन रुपयांनी वाढ होऊन वरई ११० ते ११५ रुपये प्रति किलो झाली आहे. राजगिऱ्याच्या दरात प्रति क्विंटल १०० रुपयांनी वाढ होऊन राजगिरा १०००० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. राजगिऱ्याची किरकोळ विक्री ९० ते १०५ रुपये, अशी राहील, अशी माहिती भुसार मालाचे व्यापारी आशिष दुगड यांनी दिली.

शेंगदाण्याच्या दरात सरासरी आठ ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. घुंगरू शेंगदाणा प्रति किलो १०३ ते १०५ रुपये, लहान घुंगरू शेंगदाणा प्रति किलो ११० ते १६० रुपये तर स्पॉनिश शेंगदाणा १०७ ते ११० रुपये प्रति किलो, असा दर राहील, अशी माहिती व्यापारी अशोक लोढा यांनी दिली आहे.

खाद्यतेलाचे दर सरासरी १० ते १५ रुपयांनी उतरले आहेत. एक जूनच्या तुलनेत १५ किलोच्या डब्यामागे पामतेलाचे दर ४९० रुपयांनी उतरले आहेत. जून महिन्यात पामतेल २४४० रुपये होते, ते आता १९५० रुपये झाले आहेत. पामतेल १३० रुपये प्रति किलो झाले आहे. सोयाबीन तेल २४८० रुपये होते, ते आता २०५० रुपये झाले आहे. सोयाबीन तेलाचे प्रति किलो दर १४० रुपयांवर आले आहेत. सूर्यफूल तेलाचे दर २८२५ रुपये होते, ते आता २५८५ रुपयांवर आले आहेत, प्रति किलो विक्रीचे दर १७३ रुपयांवर आले आहेत. शेंगदाणा आणि तिळाच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. शेंगदाणा तेल २७५० रुपयांवर आहे, किरकोळ विक्री दर प्रति किलो १८४ रुपये, तर तिळाचे दर २८०० रुपयांवर असून, प्रति किलोचे दर १८७ रुपयांवर आहेत, अशी माहिती खाद्यतेलाचे व्यापारी रायकुमार नहार यांनी दिली. दरम्यान, केंद्र सरकारने सहा जून रोजी खाद्यतेल उत्पादक कंपन्यांबरोबर चर्चा करून खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी दबाव वाढवला होता. त्यामुळे भविष्यात खाद्यतेलाचे दर आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे.

दरवाढ किती? साबुदाणे आणि वरई किरकोळ बाजारात दोन ते तीन रुपयांनी, राजगिऱ्याच्या दरात तीन ते पाच रुपये तर शेंगदाण्याच्या दरात  आठ ते दहा रुपये वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यानी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिलासा कोणता? दिलासा देणारी बाब इतकीच की, खाद्यतेलांच्या दरात सरासरी १० ते १५ रुपयांची घट झाल्यामुळे उपवासाला तळणीचे पदार्थ मनसोक्त खाता येणार आहेत.