scorecardresearch

पुणे: दोन्ही धर्मातील लोकांना भोंग्याचा त्रास नाही; मंदिर-मशिदीत जाऊन पोलिसांची जनजागृती

सध्या राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. त्यामुळे मशीद आणि मंदिरात पोलिसांना बैठका घेऊन भोंग्यांविषयी जनजागृती करण्याची वेळ आलीय.

सध्या राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. त्यामुळे मशीद आणि मंदिरात पोलिसांना बैठका घेऊन भोंग्यांविषयी जनजागृती करण्याची वेळ आलीय. पिंपरी-चिंचवडमध्ये हिंदू आणि मुस्लीम बांधवांना एकत्र बोलावून बैठका घेण्यात येत आहेत. शहरातील नेहरू नगर भागात मशीद, हनुमान मंदिर, साई मंदिर आणि महादेव मंदिर शेजारी- शेजारी आहेत. मात्र आम्हाला एकमेकांच्या भोंग्यांचा कधीच त्रास झाला नाही, अशी प्रतिक्रिया जामा मशीदीचे अध्यक्ष नजीर भाई आणि हनुमान मंदिराचे ट्रस्टी हृषीकेश भोसले यांनी दिली आहे. गेल्या ४० वर्षांपासून येथे हिंदू मुस्लीम ऐक्याची परंपरा सुरू आहे. याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी बैठक घेऊन भोंग्यांविषयी जनजागृती केली. 

पिंपरी-चिंचवडच्या नेहरू नगर परिसरात काही फुटांवर मशीद, हनुमान मंदिर, साई मंदिर आणि महादेव मंदिर अशी धार्मिक प्रार्थनास्थळे आहेत. दोन्ही धर्मातील नागरिकांना अजान, आरतीचा कधीच त्रास झाला नाही. मात्र, मनसेच्या आंदोलनानंतर भोंग्याचा विषय पुढे आला असून परवानगी घ्यावी लागत आहे. येथील तवकल्ला जामा मशीदीचे अध्यक्ष नजीर भाई म्हणाले की, पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही परवानगी काढणार आहोत, त्याबाबतचा अर्ज पोलीस ठाण्यात दिला आहे. सर्व अटी शर्थीचं पालन करणार आहोत. ४ मे पासून भोंग्यावरील अजान बंद आहे. पुढे ते म्हणाले की, येथील हिंदू बांधवांना भोंग्याचा कधीच त्रास झाला नाही, आम्ही त्यांच्या सणावाराला जातो. गेल्या ४० वर्षांपासून आम्ही इथं सलोख्यानं राहत आहोत. 

हनुमान मंदिर ट्रस्टचे हृषीकेश भोसले म्हणाले की, मशिदीच्या भोंग्यापासून आम्हाला त्रास झाला नाही. त्यांनी परवानगी मिळावी म्हणून पोलिसांत अर्ज केलाय, त्यांना पोलिसांनी परवानगी द्यावी. भोंग्याबद्दल आम्ही एकमेकांच्या विरोधात कधी तक्रार केली नाही. उलट आम्ही एकमेकांच्या सणांमध्ये आनंदाने सहभागी होतो. भोंग्यावरील आरतीची आणि अजानची नागरिकांना सवय झाली होती. याचा कधी कोणाला त्रास झाला नाही, असंही त्यांनी म्हटलं. 

दोन्ही समाजाच्या एकत्रित बैठकीत पोलीस काय म्हणाले?
मशीद, हनुमान मंदिर, साई मंदिर आणि महादेव मंदिर हे सर्व धार्मिक प्रार्थनास्थळं शेजारी आहेत. संबंधित मंदिर आणि मशिदीच्या विश्वस्तांना बोलावून भोंग्यांविषयी जनजागृती करण्यात आली. भोंगा वाजवायचा असल्यास परवानगी घेणं गरजेचं आहे. तसेच आवाज मर्यादित ठेवावा लागणार आहे. नागरीवस्तीत दिवसा ५५ डेसीबेल तर रात्री ४५ डेसीबेल एवढा आवाज ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी बैठकीत सांगितलं. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: People of both religions dont have problem with loud speaker police aware them by going to temples and mosques pune kjp 91 rmm

ताज्या बातम्या