पुणे : जगातील थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ९९ टक्के जनता श्वासावाटे दूषित हवा शरीरात घेत असून त्यामुळे हवेतील घातक सूक्ष्म कण आणि नायट्रोजन डायऑक्साईड यांचे मानवी शरीरातील प्रमाण वाढत आहे. त्याचे दूरगामी परिणाम मानवी आरोग्यावर होणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य दिनाच्या (७ एप्रिल) पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे.

भविष्यात वायू प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून अधोरेखित करण्यात आले आहे. शहरी भागातील वाढत्या इंधन वापरामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणातून बाहेर पडणारे नायट्रोजन डायऑक्साईडचे हवेतील प्रमाण धोक्याची पातळी ओलांडत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. हवेतील हे सूक्ष्म कण रक्तप्रवाहात मिसळण्याची क्षमता असल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी विकार, सेरेब्रोव्हास्क्युलर (पक्षाघात सदृश) आणि श्वसनविकारांमध्ये वाढ होत आहे.

सद्यस्थितीत जगातील सुमारे सहा हजार शहरे हवेच्या गुणवत्तेची तपासणी करत आहेत, मात्र हे प्रमाण वाढवणे आणि हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी शाश्वत उपाय तातडीने अवलंबणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेडॉस अधानोम गेब्रेयेसस यांनी सध्या उपलब्ध ऊर्जास्रोतांना पर्याय म्हणून स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इंधनाचे प्रकार निर्माण करणे, त्यांना पूरक तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर गडद होत चाललेले तापमान वाढीचे संकट, तसेच वायू प्रदूषण यांवर उपाय म्हणून जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे ही काळाची गरज आहे, असे अहवालात नमूद केले आहे.

 हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक सूचना केल्या असून जगभरातील देशांनी त्यांची तातडीने अंमलबजावणी करणे उपयुक्त ठरेल, असेही आवाहन अहवालातून करण्यात आले आहे.

  • हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करा आणि वायुप्रदूषणाचे स्रोत ओळखा.
  • स्वयंपाक, प्रकाश आणि ऊर्जेच्या गरजेसाठी पर्यायी ऊर्जास्रोतांचा वापर करा.
  • कचरा व्यवस्थापनामध्ये पर्यावरण पूरक पर्यायांचा अवलंब करा.
  • कृषी कचरा जाळणे, जंगलातील आग किंवा वणवे अशा घटनांवर नियंत्रण ठेवा.