गणेश विसर्जन मिरवणूक सुरळीत व योग्य वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांसाठी व ढोल तसेच बँण्ड पथकांसाठी वाहतूक शाखा व शहर पोलिसांच्या वतीने विविध मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. मानाचे पाच व महत्त्वाच्या पाच मंडळांशी झालेल्या चर्चेनुसार प्रत्येक मंडळाला मिरवणुकीत तीनपेक्षा अधिक ढोल किंवा बँण्ड पथकाचा समावेश करता येणार नाही. थांबून वादन करण्याचे चौकही ठरवून देण्यात आले असून, लक्ष्मी रस्त्यावर केवळ तीनच ठिकाणी थांबून दहा मिनिटांचे वादन करता येणार आहे.
कसबा गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग मंडळ व केसरीवाडा ट्रस्ट मंडळ या मानाच्या पाच गणेश मंडळांसह श्रीमंत भाऊ रंगारी मंडळ, अखिल मंडई गणपती मंडळ, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळ, जिलब्या मारुती मंडळ व हुतात्मा बाबूगेणू मंडळ या मंडळांशी झालेल्या बैठकीनंतर मंडळांना मिरवणुकीत तीन पथकांना परवानगी देण्यात आली आहे. या पथकांची नावेही पोलिसांनी जाहीर केली असून, जाहीर नावांखेरीज इतर कुणालाही मिरवणुकीत वादन करता येणार नाही. ढोल पथकामध्ये पूर्वीप्रमाणेच टोलचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यंदा स्पीकरच्या भिंती उभारणे, डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यासही मनाई करण्यात आली आहे. फटाके वाजविणे, शोभेचे दारूकाम करणे, आगीचा खेळ करणे व गुलालाचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यासही मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विसर्जन मार्गावरील पथकांचे थांबेही ठरवून देण्यात आले असून, त्याच ठिकाणी थांबून वादन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
———- लक्ष्मी रस्ता
लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर सकाळी साडेदहा वाजता मंडईतील टिळक पुतळा येथून मिरवणुकीस सुरुवात होईल. मानाचे पहिले पाच गणपती बेलबाग चौकातून पुढे गेल्यानंतर सिटी पोस्ट ऑफीसजवळ लागलेल्या रांगेतील बिगर रोषणाईची मंडळे शिवाजी रस्त्यावरून लक्ष्मी रस्त्याकडे जातील. महत्त्वाचे शेवटचे पाच गणपती बेलबाग चौकातून पुढे गेल्यानंतर लक्ष्मी रस्ता व शिवाजी रस्त्यावर रांगा लावलेल्या गणेश मंडळांना पाच-पाचच्या संख्येने पुढे जाता येईल. लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन चौक, उंबऱ्या गणपती चौक व टिळक चौक या प्रमुख चौकांमध्ये गणेश मंडळांना जास्तीत जास्त दहा मिनिटे थांबून बँण्ड व ढोल पथकांचे वादन करता येईल. या रस्त्याने दोनशे मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
———- टिळक रस्ता
टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक दुपारी बारा वाजता पुरम चौक येथून सुरू होईल. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळांना टिळक चौकातून लकडी पुलाकडे जाता येणार नाही. त्यांना एस.एम. जोशी पुलाजवळील विसर्जन घाटाकडेच जावे लागेल. या रस्त्यावर पुरम चौक, स.प. महाविद्यालय चौक, भारती विद्यापीठ भवन व गांजवे चौक या चौकात १० मिनिटे थांबून वादन करता येईल. या रस्त्यावरूनही दोनशे मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
——– केळकर रस्ता
केळकर रस्त्यावरील मिरवणूक अप्पा बळवंत चौकातून सुरू होईल. केसरी वाडा, टकले हवेली चौक मार्गाने भिडे पुलावर किंवा लकडी पुलावर पांचाळेश्वर घाट किंवा नटेश्वर घाट येथे गणेश मंडळे जाऊ शकतील. या रस्त्याने ७० मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. या मंडळांनी फडके हौद चौक, लाल महाल, देसाई कॉलेज, फुटका बुरूजमार्गे अप्पा बळवंत चौकात जावे. मानाचे पहिले पाच गणपती टिळक चौकात येईपर्यंत केळकर रस्त्यावरून येणारी मंडळे टिळक चौकातून लकडी पूलमार्गे जाऊ शकतील.
——– कुमठेकर रस्ता
कुमठेकर रस्त्यावरील मिरवणूक सकाळी दहानंतर शनिपार चौकातून सुरू होईल. त्यात ७५ मंडळे सहभागी होणार आहेत. या मार्गावरील मंडळांनाही टिळक चौकातून लकडी पुलाकडे जाता येणार नाही. त्यांना एस.एम. जोशी पुलाजवळील विसर्जन घाटाकडे जावे लागेल. विसर्जन मिरवणूक टिळक चौकात आल्यानंतर डावीकडे वळून गांजवे चौक त्यानंतर डावीकडे वळून पत्रकार भवनमार्गे विसर्जन घाटाकडे जाता येईल. या मार्गावर कुठेही थांबून वादन करता येणार नाही.