पुण्यात सुरू झालेल्या ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’ने गेल्या २६ वर्षांत सॉफ्टवेअर विकसनाच्या क्षेत्रात उत्तम नाव कमावले आहे. ज्या काळी माहिती तंत्रज्ञानात व्यवसाय करण्यात अनेक पायाभूत सुविधांच्या अडचणी होत्या, त्या काळात ही कंपनी सुरू झाली. सर्व आव्हाने पेलत टिकून राहिली आणि विस्तारली. आज बारा देशांमध्ये त्यांची केंद्रे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातून सॉफ्टवेअर निर्यात करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी १९९०च्या सुमारास ‘सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क’ अशी एक योजना सुरू झाली होती. त्या वेळी आनंद देशपांडे हे अमेरिकेत कार्यरत होते. या योजनेविषयी कळल्यावर त्यांनी पुण्यात परतून एक कंपनी सुरू करण्याचे ठरवले. माहिती तंत्रज्ञान व सॉफ्टवेअर क्षेत्रात आपली एक विशेष ओळख तयार केलेली हीच ती ‘पर्सिस्टंट’ कंपनी.

देशपांडे यांनी कंपनीला ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’ असे नाव देतानाही बराच विचार केला होता. संगणकीय भाषेत ‘डिस्क’वर लिहिल्या जाणाऱ्या डेटा प्रणालींना ‘पर्सिस्टंट’ म्हणतात. शिवाय ‘चिकाटीने टिकून राहणारे’ या अर्थीही जाणीवपूर्वक हे नाव निवडले गेले. कंपनीचे बोधचिन्ह तयार करताना इंग्रजी ‘पी’ आणि ‘एस’ एकत्र करून गणितातील ‘इन्फिनिटी’चा आकार तयार करण्यात आला. ते सूचक तर होतेच, पण या क्षेत्रातील काही प्रसिद्ध कंपन्यांप्रमाणे ‘पर्सिस्टंट’नेही आपले बोधचिन्ह दर दहा वर्षांनी बदलले. देशपांडे यांनी मे १९९० मध्ये कंपनीची नोंदणी केली आणि पुणे हेच कंपनीचे प्रमुख कार्यालय राहिले.

त्या काळी या क्षेत्रातील उद्योजकांना करावा लागलेला संघर्ष आणि आताचा संघर्ष पूर्णत: वेगळा असल्याचे देशपांडे सांगतात. त्यामुळे ‘पर्सिस्टंट’लाही पहिले सहा ते आठ महिने बराच संघर्ष करावा लागला. त्या वेळी ‘पर्सिस्टंट’ ही छोटी कंपनी होती. त्या काळातील प्रमुख प्रश्न म्हणजे पायाभूत सुविधांचा अभाव. दूरस्थ पद्धतीने संवाद साधणे ही तेव्हा आतासारखी सोपी बाब नव्हती. अमेरिकेत साधा दूरध्वनी करायचा म्हटले तरी अगदी थोडय़ा वेळात पाचशे किंवा हजार रुपये सहज खर्च होत होते. व्यवसायासाठी इतरही काही अडसर होते. सॉफ्टवेअरच्या ग्राहकांनी इथून काम करून घ्यावे यासाठी त्यांना तयार करणे हे त्यामुळे आव्हान असे. आपल्या सॉफ्टवेअर निर्मात्यांना मागणी पूर्ण करणे शक्य होईल का, अशी शंका अनेक ग्राहक काढत. पुढील आठ ते दहा वर्षांत मात्र परिस्थिती बदलली आणि भारतीय कंपन्यांची सॉफ्टवेअर उत्पादक म्हणून ओळख तयार होऊ लागली. आता सॉफ्टवेअर बनवण्याच्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी बदलल्या आहेत. तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांच्या वेगाशी जुळवून घेणे आणि कंपनीचा विकासाचा दरही सांभाळणे ही आजची आव्हाने आहेत.

सर्व आव्हानांचा सामना करत हळूहळू विस्तार करण्याकडे ‘पर्सिस्टंट’ने लक्ष दिले. मनुष्यबळाच्या दृष्टीने झालेला त्यांचा विस्तार पाहिला तरी ही बाब लक्षात येईल. ‘पर्सिस्टंट’ सुरू झाल्यानंतर नऊ वर्षांनी म्हणजे १९९९ मध्ये त्यांच्याकडील मनुष्यबळ १०० इतके झाले आणि २००३ मध्ये कंपनीत पाचशे लोक काम करत होते. त्यानंतर २००८ मध्ये २,५०० मनुष्यबळ झाले. सध्या या कंपनीत ९,५०० लोक काम करतात. आता ‘पर्सिस्टंट’ ही केवळ पुण्याची कंपनी राहिली नाही, तर ती ‘ग्लोबल’ झाली आहे. बारा देशांमध्ये त्यांची प्रोग्रॅमिंग, अभियांत्रिकी आणि विक्री केंद्रे आहेत. जगभरातील ग्राहकांना व्यवसायासाठी लागणारी सॉफ्टवेअर व इंटरनेटवर आधारित प्रणाली (‘डेटा, डिजिटल, आयओटी’) ते बनवतात. ‘ऑफशोअर’ किंवा ‘आऊटसोर्सिग’ कंपनी या ऐवजी सॉफ्टवेअर विकसित करणारी कंपनी म्हणून त्यांनी आपली ओळख तयार केली, असे देशपांडे आवर्जून सांगतात.

या क्षेत्रातील लहान कंपन्यांना यशस्वी व्हायचे असेल तर त्यांच्याकडे काहीतरी वेगळेपण हवेच. ‘‘या गोष्टीचा आधीपासून आम्ही विचार केला. आम्ही केवळ माहिती तंत्रज्ञानातील सेवा पुरवणारी कंपनी राहिलो नाही आणि ‘आयटी’मधील ‘डेटा, डिजिटल, आयओटी’ या क्षेत्रात कंपनीचे वैशिष्टय़ निर्माण केले,’’ असे देशपांडे सांगतात.

sampada.sovani@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Persistent systems software industry
First published on: 24-08-2017 at 03:59 IST