रंगभूमीचे अनभिषिक्त नटसम्राट, नाटककाराचे शब्द रसिकांपर्यंत पोहोचविणारे लमाण आणि अभिनयाला शेवटपर्यंत परमोच्च स्थान देणारे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व डॉ. श्रीराम लागू (९२) यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात मंगळवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री दीपा श्रीराम आणि मुलगा आनंद असा परिवार आहे.
ज्येष्ठ नाटककार वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाने त्यांना ओळख दिली. रंगभूमीवर एक काळ गाजविलेल्या परंतु वृद्धावस्थेत फरफट झालेल्या अप्पासाहेब बेलवलकर या अभिनेत्याची भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारली होती. मराठी रंगभूमीवरील नटसम्राट असाच त्यांचा परिचय झाला. या भूमिकेचे गारुड रसिकांबरोबरच रंगभूमीवरील अनेक कलाकारांवर होते. लागू यांनी अजरामर केलेली ही भूमिका नंतरच्या काळात दत्ता भट, सतीश दुभाषी, यशवंत दत्त, डॉ. लक्ष्मणराव देशपांडे, राजा गोसावी, उपेंद्र दाते यांनी साकारली. ‘वेडय़ाचं घर उन्हात’, ‘जगन्नाथाचा रथ’, ‘गिधाडे’, ‘काचेचा चंद्र, ‘आधे अधुरे’, ‘गाबरे’, ‘कन्यादान’, ‘सुंदर मी होणार’ आणि ‘मित्र’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. मकरंद साठे यांनी लिहिलेले ‘सूर्य पाहिलेला माणूस’ हे त्यांचे रंगभूमीवरचे अखेरचे नाटक ठरले.
व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ पिंजरा’ या चित्रपटाद्वारे त्यांचे रुपेरी पडद्यावर पदार्पण झाले. एका आदर्श मास्तराच्या आयुष्याचा तमाशा कलावंतीणीमुळे होणारा प्रवास त्यांनी आपल्या अभिनयातून प्रभावीपणे रेखाटला होता. ‘सिंहासन’, ‘सामना’ आणि ‘मुक्ता’ या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
मराठीप्रमाणेच डॉ. लागू यांनी हिंदूी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ‘इन्कार’, ‘घरोंदा’, ‘मुकद्दर का सिकंदर’ यांसह विविध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या भूमिकांचा ठसा उमटविला होता. ‘अनकही’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला समीक्षकांनी वाखाणले होते.
डॉ. लागू यांचा तरुण मुलगा तन्वीर याला रेल्वेतून प्रवास करताना बाहेरून फेकण्यात आलेल्या दगडामुळे मोठी दुखापत झाली आणि त्यातच त्याचे निधन झाले. त्याची स्मृती जपण्यासाठी त्यांनी तन्वीर सन्मान देण्यास सुरुवात केली. डॉ. श्रीराम लागू अध्यक्ष असलेल्या रूपवेध प्रतिष्ठानतर्फे ९ डिसेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना हा तन्वीर सन्मान प्रदान करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. लागू उपस्थित राहू शकले नव्हते. या कार्यक्रमानंतर त्यांचे पुत्र आनंद अमेरिकेला गेले. ते गुरुवारी (१९ डिसेंबर) पुण्यात पोहोचल्यानंतर डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
भूमिकेवर ठाम : ‘देवाला रिटायर करा’ या डॉ. लागू यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात मोठे वादळ उठले होते. त्यांच्यावर टीकेचा भडिमारही झाला. परंतु डॉ. लागू यांनी आपली भूमिका बदलली नाही. आयुष्यभर ते या भूमिकेचा पुनरुच्चार करीत राहिले.
कलाकारासाठी अभिनय हाच महत्त्वाचा असतो. मग, ते नाटक असो, चित्रपट की तमाशा हा माध्यमाचा भाग नंतर येतो. एकदाचा अभिनय माझ्या बोकांडी असा बसला की तो मला सोडेनाच. ‘तू माध्यम कोणतेही घे. पण, अभिनय सोडू नको’, हेच मला खुणावत राहिले. कलाकारासाठी माध्यमापेक्षाही अभिनय करणे हेच महत्त्वाचे असते. – डॉ. श्रीराम लागू (नव्वदाव्या वाढदिवसाला दिलेल्या मुलाखतीमधून)