राज्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू असताना. पुण्यातील कोंढवा भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याकडून काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटे असलेला फ्लेक्स लावण्यात आला आहे. या फ्लेक्सची शहरभर चर्चा सुरु आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले तरी अद्याप सत्ता स्थापन होऊ शकलेली नाही. शिवसेनेने निवडणुकीपूर्वी ठरल्याप्रमाणे सत्तेत समान वाटा मिळावा अशी मागणी लावून धरली आहे. यावरून चांगलेच राजकारण तापले असून भाजपाही मागे हटण्यास तयार नसल्याने त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे मावळत्या विधानसभेची मुदत आज संपल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नियमानुसार राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून, आता जबाबदारी पार पाडणार आहेत.

या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना पुण्यातील कोंढवा भागात एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो असलेला फ्लेक्स लावण्यात आला आहे. त्यावरील महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्रातील पावरबाज जनतेने, संघर्षातील आदेश स्वीकारला आहे…! बळीराजाच्या मनातील अन हातातील घड्याळाच्या अचूक वेळेने, धनुष्यबाणातील अचूक वेधाने जनता राजा स्वीकारावा…! अशा आशयाचा मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकमेकांच्या विरोधात सतत टीका करणाऱ्या या मंडळींचे एकाच फ्लेक्सवर फोटो पाहून नागरिकांच्याही भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे या फ्लेक्सची शहरात एकच चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्यात आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित येऊन नव्या सत्तेचा पॅटर्न उदयास आणणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.