पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० साठी उपस्थित सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकांची स्कॅन छायाप्रत, निकालासाठी गृहित धरलेले गुण आणि प्रवर्गांसाठीचे पात्रता गुण संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांना त्यांचे गुण पाहण्यासाठी उपलब्ध होणार असून, आयोगाने पहिल्यांदाच अशा प्रकारे मूळ उत्तरपत्रिकांची प्रत उपलब्ध करून दिली आहे.

एमपीएससीने परिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. उमेदवारांना मूळ उत्तरपत्रिकांची स्कॅन छायाप्रत पाहण्यासाठी संकेतस्थळावरील ऑनलाइन फॅसिलिटीजमध्ये जाऊन व्ह्यू मार्कशीट हा पयार्य निवडावा लागेल. त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी लागेल. परीक्षेच्या अर्जात नमूद केलेला मोबाइल क्रमांक त्या मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी भरून लॉगीन केल्यावर गुणपत्रक आणि स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध होईल. या कार्यपद्धतीनुसार गुणपत्रक आणि स्कॅन उत्तरपत्रिका मिळण्यात अडचण येत असल्यास १८००१२३४२७५, ७३०३८२१८२२ या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ही सुविधा १० नोव्हेंबरपर्यंत खुली राहणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

एमपीएससीचा हा निर्णय उमेदवारस्नेही आणि अधिक पारदर्शकतेकडे घेऊन जाणारा असल्याची प्रतिक्रिया उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

२००३ पासून एमपीएससीकडून उमेदवारांना उत्तरतालिका देण्यास सुरुवात झाली. २००७ पासून उत्तरपत्रिकेची कार्बनकॉपी देण्यात येऊ लागली. त्यावेळी तो निर्णय घेणारा एमपीएससी हा देशातील पहिला लोकसेवा आयोग होता. आता तंत्रज्ञान अधिक विकसित झाल्याने उमेदवारांची मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन छायाप्रत आणि उमेदवारांचे गुण, प्रवर्गनिहाय पात्रता गुण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. देशात पहिल्यांदाच एमपीएससीकडून उमेदवारांना त्यांची मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन छायाप्रत देण्यात येत आहे. याद्वारे एमपीएससीच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यास मदत होईल.           – सुनील अवताडे,

सहसचिव, एमपीएससी