पुण्यात सध्या न्यूड फोटोंमुळे एक वाद निर्माण झाला आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात फोटोग्राफर अक्षय माळी या तरुणाने न्यूड फोटोचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. पण विरोध दर्शवल्याने हे प्रदर्शन बंद करावं लागलं आहे. यामुळे अक्षयने नाराजी व्यक्त केली असून अशा प्रकारचे प्रदर्शन भविष्यातदेखील आयोजित करणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच यातून समाजाची मानसिकता समोर येत आहे असं म्हणत आपला संतापही व्यक्त केला आहे.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात भरलं होतं न्यूड फोटोंचं प्रदर्शन, एक फोन येताच झालं बंद; नेमकं काय झालं?

“मी ७ जानेवारीला बालगंधर्व कलादालनात न्यूड फोटोंचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. या प्रदर्शनाला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. पण त्याच दरम्यान एक व्यक्ती आला आणि माझ्याकडे फोन दिला आणि तुमच्याशी एकाला बोलायाचं आहे सांगितलं. त्यावर मी फोन घेताच समोरील व्यक्ती म्हणाला की हे प्रदर्शन दोन मिनिटात बंद कर, अन्यथा आम्ही बंद करू. असे म्हणताच मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिर व्यवस्थापनाने प्रदर्शन कोणालाही पाहू दिले नाही. या घडामोडीनंतर मी प्रदर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला,” अशी माहिती अक्षय माळीने दिली. तसंच आपण लाज सोडली आहे अशा शब्दात त्याने टीव्ही ९ शी बोलताना संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान यावेळी त्याने आपण बालगंधर्व मंदिरात अर्ज देताना त्यावर न्यूड फोटो असा उल्लेख केला नव्हता कारण आपल्याला फोटोग्राफीत फरक करायचा नव्हता. मी कोणतीही चुकीची गोष्ट केली नसून कोणालाही दुखावलेलं नाही. मानसिक इजा मी मानत नाही, कारण ती आपण स्वत: करुन घेतो. यात कोणत्याही धर्माचा अनादर केलेला नाही असं यावेळी त्याने सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षय माळीने प्रदर्शन बंद करावं लागल्याने नाराजी जाहीर केली आहे. “या सर्व प्रकारानंतर समाजातील काही लोकांची मानसिकता समोर आली आहे. पण असो, यापुढेदेखील शहरातील काही प्रदर्शनाच्या गॅलरी आहेत तिथे अशा प्रकारचे प्रदर्शन निश्चित भरवणार असल्याचे त्याने सांगितलं.