कात्रज येथील उद्यानात महापालिकेतर्फे फुलराणी सुरू होत असून, फुलराणीचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी (२ मे) होणार आहे. एका वेळी चौसष्ट जण या फुलराणीतून कात्रज उद्यान व परिसरात फेरी मारण्याचा आनंद लुटू शकतील.
स्थानिक नगरसेवक वसंत मोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कात्रज उद्यानातील फुलराणीच्या प्रकल्पाचे काम गेले वर्षभर सुरू होते. या संपूर्ण प्रकल्पाला एक कोटी ३२ लाख रुपये खर्च आला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जेथे जेथे फुलराणी आहे त्यातील ही सर्वात मोठी फुलराणी असल्याचे मोरे यांनी सांगितले. या फुलराणीला चार डबे असून रुळांची लांबी ४२७ मीटर इतकी आहे. त्यातून एकावेळी चौसष्ट जण प्रवास करू शकतील.
फुलराणीच्या मार्गावर एक बोगदाही करण्यात आला असून, प्रौढांसाठी वीस आणि लहानांसाठी दहा रुपये असे तिकीट दर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली. या फुलराणीचे उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. महापौर दत्तात्रय धनकवडे आणि पदाधिकाऱ्यांची या वेळी प्रमुख उपस्थिती असेल.
संग्रहित लेख, दिनांक 30th Apr 2015 रोजी प्रकाशित
कात्रज उद्यानातील फुलराणीचे शनिवारी राज यांच्या हस्ते उद्घाटन
कात्रज येथील उद्यानात महापालिकेतर्फे फुलराणी सुरू होत असून, फुलराणीचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी (२ मे) होणार आहे.

First published on: 30-04-2015 at 03:07 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phulrani katraj raj thackeray mns