पौगंडावस्थेतील कोवळे प्रेम, स्वप्नाळूपणा आणि जातिभेदाच्या भिंतींची कटू जाणीवही समर्थपणे मांडणाऱ्या ‘फँड्री’ या चित्रपटाने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केवळ प्रेक्षकांचीच नव्हे तर परीक्षकांचीही भरभरून पसंती मिळवली. राज्य सरकारतर्फे सवरेत्कृष्ट चित्रपटासाठी देण्यात येणारे पाच लाख रुपयांचे ‘संत तुकाराम’ पारितोषिक ‘फँड्री’ने पटकावलेच, शिवाय दिग्दर्शन, अभिनय आणि चलचित्रण अशा सर्वच आघाडय़ांवर तो सर्वोत्तम ठरला. तर जागतिक स्पर्धेत ‘पापुझा’ या पोलंडच्या चित्रपटाने सवरेत्कृष्ट चित्रपटासाठीचे दहा लाख रुपयांचे ‘प्रभात’ पारितोषिक मिळवले.
आइसलँड देशाचे राजदूत गुडमुंडुर इरिक्सन आणि इटलीच्या सांस्कृतिक विभागाच्या सहायक राजदूत पेट्रिशिया यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी महोत्सवाचा दणक्यात समारोप झाला. या वेळी महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे संचालक आशुतोष घोरपडे, फिल्म इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे संचालक डी. जे. नारायण, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके, सिटीप्राइड चित्रपटगृहाचे मालक अरविंद व प्रकाश चाफळकर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर आणि विविध देशांतून आलेले चित्रपट परीक्षक या वेळी उपस्थित होते.
मराठी विभागात नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’, सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांचा ‘अस्तू’, आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘नारबाची वाडी’, अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रेगे’, लक्ष्मण उतेकर यांचा ‘टपाल’, वैभव आबनावे यांनी दिग्दर्शित केलेला ‘मौनराग’ आणि राजीव पाटील दिग्दर्शित ‘७२ मैल – एक प्रवास’ या चित्रपटांमध्ये चुरस होती. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये नागराज मंजुळे यांना सवरेत्कृष्ट दिग्दर्शनासाठी तर ‘फँड्री’मध्ये प्रमुख भूमिका निभावणाऱ्या सोमनाथ अवघडे याला सवरेत्कृष्ट अभिनयासाठीचा पुरस्कार मिळाला. ‘फँड्री’च्याच चलचित्रणासाठी विक्रम अलमाडी यांना पुरस्कार मिळाला. ‘अस्तू’साठी सुमित्रा भावे यांना सवरेत्कृष्ट पटकथेचे तर ‘नारबाची वाडी’साठी मंगेश डहाके यांना सवरेत्कृष्ट संगीतासाठीचे पारितोषिक मिळाले.
दिग्दर्शनातही ‘पापुझा’ सर्वोत्तम!
जागतिक चित्रपटांच्या स्पर्धेत सवरेत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे ‘प्रभात’ पारितोषिक ‘पापुझा’साठी जोना कॉस क्राऊझे आणि क्रझिस्तोफ क्राऊझे या जोडीला आणि इटलीच्या ‘फॉरेन बॉडीज’या चित्रपटासाठी मिर्को लोकॅटेली यांना विभागून देण्यात आले. तर चीन आणि जपानच्या ‘अ टच ऑफ सिन’ने परीक्षकांचा विशेष पुरस्कार मिळवला. ‘हाउस ऑफ द टरेट’साठी दिग्दर्शक इव्हा नेमॅन यांचा तसेच ‘रोझी’साठी अभिनेत्री सिबिली ब्रनर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ‘नाइट ट्रेन टू लिस्बन’ला प्रेक्षकांचा विशेष पुरस्कार मिळाला. ‘स्टुडंट काँपिटिशन’मध्ये एलव्ही प्रसाद अकॅडमीचा ‘डेव्हिल इन द स्टोन’ हा लघुपट तसेच डीएसके सुपइन्फोकॉमचा ‘फकीर’ आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइनचा ‘आय कँडी’ हे अॅनिमेशनपट सर्वोत्तम ठरले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2014 रोजी प्रकाशित
‘फँड्री’ला ‘संत तुकाराम’ पारितोषिक
कोवळे प्रेम, स्वप्नाळूपणा आणि जातिभेदाच्या भिंतींची कटू जाणीवही समर्थपणे मांडणाऱ्या ‘फँड्री’ या चित्रपटाने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केवळ प्रेक्षकांचीच नव्हे तर परीक्षकांचीही भरभरून पसंती मिळवली.

First published on: 17-01-2014 at 03:23 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Piff fandry papuza sant tukaram award conclusion