राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजपाला गळती लागली असून अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधनाला दिसत आहेत. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये आता स्थानिक आमदाराच्या हुकूमशाहीला कंटाळून भाजपाच्या तुषार कामठे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, तुषार कामठे हे नगरसेवक पदाचा राजीनामा देत असताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे उपस्थित होते. त्यामुळे आता तुषार कामठे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का अशी चर्चा रंगली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी महानगर पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपाला गळती लागली आहे. काही महिन्यावर आलेली महानगर पालिका निवडणुकीचा मुहूर्त साधून एक-एक जण भाजपामधून काढता पाय घेत आहेत. अद्याप महानगर पालिका निवडणूक कधी होणार हे स्पष्ट नाही. मात्र, भाजपाचे नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधताना दिसत आहेत. स्थानिक आमदारांची हुकूमशाही आणि भाजपामधील बोकाळलेला भ्रष्टाचार याला कंटाळून नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे तुषार कामठे यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितले आहे.

भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी पदाचा राजीनामा दिला

अनेक भ्रष्टाचार बाहेर काढले पण भाजपामधील एक ही नगरसेवक, नेता पाठीशी थांबला नाही. उलट, विरोधी पक्षातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार्य केले. पण, स्थानिक नेते पाठीशी उभे राहिले नाहीत याची खंत मनात होती. त्यामुळे राजीनामा देत आहे असे, कामठे यांनी स्पष्ट केलं आहे.

“दादा तुमचे खूप आभार! आज आपण दाखवून दिले जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे. भ्रष्टाचार नष्ट झालाच पाहिजे मग तो भ्रष्टाचारी कोणी का असेना. यांनी घेतलेल्या निःपक्षपाती निर्णयामुळे सिक्युर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट या घोटाळेबाज कंपनीवर गुन्हा दाखल झाला आहे, त्याबद्दल दादा आपले मनस्वी आभार,” असे कामठे यांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. पण नगरसेवक पदाचा राजीनामा देत असताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे सोबत होते. त्यामुळे कामठे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.