पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (२०२६-२७)च्या अर्थसंकल्पासाठी उद्यापासून (१५ ऑगस्ट) नागरिकांना ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने कामे सुचविता येणार आहेत. रस्ते, सांडपाणी, आरोग्य, उद्याने आणि क्रीडांगणे अशी कामे सुचविता येणार आहेत. या कामांसाठी त्यांच्या परिसरात वसूल होणाऱ्या मालमत्ता कराच्या दहा टक्के निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी महापालिकेच्या वतीने २००७-०८ या आर्थिक वर्षापासून नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा अर्थसंकल्पात अंतर्भाव केला जात आहे. त्यानुसार, अर्थसंकल्प तयार करताना नागरिकांकडून सूचना मागविण्यात येतात. शहरातील विविध विकासकामे अधिक चांगल्या पद्धतीने व्हावीत, योजनांच्या अंमलबजावणीत नागरिकांचा सहभाग वाढावा आणि विकासकामांवर लक्ष असावे, अर्थसंकल्प लोकाभिमुख व्हावा, यादृष्टीने नागरिकांकडून अर्थसंकल्पासाठी सूचना मागविण्याचा उपक्रम महापालिकेकडून राबविला जात आहे. अर्थसंकल्पासाठी (२०२६-२७) कामे, योजना, सूचना मागवण्यात येणार असून, त्याची सुरुवात उद्यापासून (१५ ऑगस्ट) होणार आहे.
‘असे’ सुचविता येणार कामे !
शहरातील रहिवासी अर्थसंकल्पामध्ये कोणते काम घ्यावे, याबाबत सूचना देऊ शकतो. महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून नागरिकांना सूचना देता येतील. ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात उपलब्ध आहे. मालमत्ता कराच्या दहा टक्के निधीची तरतूद करण्यात येणार आहे. हा निधी रस्ते, पादचारी मार्ग, उद्याने, सार्वजनिक सुविधा, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, पथदिवे, सुरक्षा उपाय अशा कामांसाठी वापरला जाईल. क्षेत्रीय अधिकारी नागरिकांच्या सूचनांचे, माहितीचे मूल्यांकन करतील.
सुचविलेल्या कामांसाठी १३९ कोटींचा निधी
आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयातून दोन हजार २७९ नागरिकांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. छाननीनंतर त्यांपैकी ७८६ सूचना स्वीकारण्यात आल्या. नागरिकांनी सुचवलेल्या ४९९ कामांना निधी देण्यात आला. या कामांसाठी ९४ कोटी ८६ लाख रुपये राखीव निधी ठेवण्यात आला होता. मात्र, नागरिकांनी सुचवलेल्या सामाजिक कामांना प्राधान्य देताना या कामांसाठी १३८ कोटी ९८ लाखांचा निधी वाटप केला.
‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाला सर्वाधिक लाभ
‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातील पुनावळे, ताथवडे, वाकड आणि पिंपळेसौदागर परिसरात नागरिकांनी सुचवलेली विविध कामे पूर्ण करण्यात आली. मुख्य रस्त्यांची कामे, ड्रेनेजची कामे आणि उद्यानांसाठी ४३ कोटी ८८ लाखांचा निधी देण्यात आला. ‘ब’ मधील रावेत, किवळे या भागातील कामांसाठी २० कोटी ६० लाखांचा निधी मिळाला. या निधीत रस्त्यांच्या कामांपासून रावेतमधील नवीन महापालिका शाळेपर्यंतची कामे समाविष्ट आहेत.
अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग घेतल्याने अर्थसंकल्प सर्वसमावेशक होत आहे. शहरातील गरजांनुसार नागरी सुविधांचा विकास होण्यास मदत होत आहे. आगामी अर्थसंकल्प २०२६-२७ साठी पुन्हा एकदा नागरिकांना सहभाग नोंदवता येणार आहे. – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका