पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागामार्फत ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता कर ऑनलाइन भरून या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, औद्याेगिक, बिगरनिवासी, माेकळ्या जागा अशा सात लाख ३२ हजार नाेंदणीकृत मालमत्ता आहेत. चालू आर्थिक वर्षात महापालिकेने एक हजार काेटींच्या पुढे करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत चार लाख ६० हजार मालमत्ताधारकांनी ५७४ काेटी रुपयांचा मालमत्ता कर महापालिका तिजाेरीत जमा केला आहे. शहरातील विकासकामे, सुविधा व सेवांची अखंडित अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी वेळेवर मालमत्ताकर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच वेळेवर मालमत्ताकर भरणाऱ्यांसाठी विविध सवलतीदेखील जाहीर करण्यात येतात. महापालिकेने ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना चालू वर्षाच्या सामान्य करावर चार टक्के सवलत देऊ केली आहे. जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे.
असा भरा ऑनलाइन कर
महापालिकेच्या http://www.pcmcindia.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी. मुख्य पृष्ठावरील ‘नागरिक’ या पर्यायावर क्लिक करावे आणि ‘मालमत्ता कर विभाग’ येथे जावे. त्यानंतर मालमत्तेला जोडलेला मोबाइल क्रमांक किंवा मालमत्ता क्रमांक टाकावा. मोबाइलवर एक ‘ओटीपी’ येईल. तो ‘ओटीपी’ टाकल्यानंतर, ‘बिल भरा’ हा पर्याय निवडा आणि आपल्या मालमत्ताकराचे देयक सवलतीसह भरावे.
मालमत्ताकर हा शहराच्या विकासाचा मुख्य आधार आहे. नागरिकांनी वेळेवर कर भरून केलेल्या सहकार्यामुळे महापालिकेला रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता अशा महत्त्वाच्या सेवांची अंमलबजावणी करण्यास मदत होते. नागरिकांनी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मालमत्ता कर भरून चार टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे- पाटील यांनी केले.