पिंपरी-चिंचवडमध्ये वेडा म्हणून चिडवण्यावरून तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दोन आरोपींना पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर, इतर आरोपी फरार आहेत. मनोज राजू कसबे असे मृत तरुणाचे नाव आहे. मनोज हा २५ वर्षांचा होता. मनोजला काही ओळखीचे तरुण वेडा म्हणून चिडवायचे त्यातूनच झालेल्या हणामारीमध्ये तो गंभीर जखमी झाला, असं पोलीस तपासात समोर आलंय.

या प्रकरणी पोलिसांनी सचिन निकाळजे, शौकत समीर शेख, चिम्या उर्फ सुरेश निकाळजे, मनोज अर्जुन जगताप, आनंद कदम, संतोष कदम, भूषण डुलगल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेप्रकरणी पुष्पा राजू कसबे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई करण्यात आलीय. ही घटना पिंपरीतील डीलक्स चौक परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्या मनोज राजू कसबेला आरोपी हे दररोज ‘तू वेडा आहेस’ असे चिडवायचे. ‘मी वेडा नाही’ असं मनोज वारंवार आरोपींना सांगून देखील ते सुधारत नव्हते. यामुळे मनोज दुखावला गेला होता, शिवाय त्याला संताप ही आला होता. मनोजने याच रागातून आरोपींसोबत वाद घातला. त्यानंतर आरोपींनी मनोजला काठीने मारहाण देखील केली. याच दरम्यान, आरोपींनी संगनमत करून मनोजला लाथा बुक्क्यांबरोबरच खुर्ची, लाकडी दांडके आणि लाकडी स्टंपने बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या मनोजला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तीन दिवसांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे.