पिंपरी : उर्से गावाच्या हद्दीत मेफेड्रॉन (एमडी) विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला शिरगाव पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली.

समेश राजू तिकोणे (२१, कान्हेफाटा, मावळ) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्से गावातील एका कंपनीजवळ समोश हा एमडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून समेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक लाख १७ हजार ५०० रुपये किमतीचा एमडी हा अमलीपदार्थ आढळून आला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

बाणेरमध्ये मद्य प्राशन करून मोटार चालविल्याने अपघात

मद्य प्राशन करून मोटार चालवणाऱ्या एका तरुणाने दुचाकीला धडक दिली. ही घटना सोमवारी बाणेर येथे घडली.

या प्रकरणी एका महिलेने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा भाऊ मित्राला भेटून दुचाकीवरून घरी परत येत होता. त्यावेळी, बीटवाईज चौकात मोटारीची दुचाकीला समोरून धडक बसली. या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले, तसेच फिर्यादीचा भाऊ जखमी झाला. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

निगडीत टेम्पोची पोलिसाच्या दुचाकीला धडक

निगडी येथे भरधाव वेगाने येणाऱ्या एका टेम्पोने पोलीस उपनिरीक्षकाच्या दुचाकीला धडक दिली. ही घटना आकुर्डीतील पांढरकरनगर येथे घडली.

याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक आनंद साळवी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळवी हे त्यांच्या दुचाकीवरून बिजलीनगर ते निगडी रस्त्याने घरी जात होते. संभाजी चौक, आकुर्डी येथे ते म्हाळसाकांत चौकाकडे वळण घेत असताना भेळ चौकाकडून येणाऱ्या एका टेम्पोने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले असून, साळवी यांना किरकोळ दुखापत झाली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

बीआरटी मार्गाच्या कठड्याला दुचाकी धडकल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली.

वेदांत बबन मुसने (२३, वरुण पार्क सोसायटी, पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विजय थोरात यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत हा कोकणे चौकाकडून भोसरीच्या दिशेने दुचाकीवरून चालला होता. बीआरटी मार्गाच्या कठड्याला दुचाकी धडकल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.