पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जलतरण तलावासह विविध खेळांच्या सोयीसुविधांच्या बाबतीत केलेल्या भरमसाठ शुल्कवाढीच्या मुद्दय़ावरून खेळाडू व क्रीडा संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर याबाबतचा फेरविचार शक्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेने क्रीडा सुविधांमध्ये केलेल्या शुल्कवाढीस पिंपरी-चिंचवड स्विमिंग असोसिएशनने तीव्र विरोध केला आहे. जलतरण तलावावर येणारे सामान्य नागरिक, खेळाडू, अपंग खेळाडू, ज्येष्ठ नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर गैरसोय झाली आहे. ही दरवाढ परवडणारी नाही. त्यामुळे खेळाडू व नागरिकांवर अन्याय होतो आहे. त्यामुळे सध्याची दरवाढ रद्द करून पूर्वीचेच दर कायम करावेत, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष के. ए. कांबळे यांनी केली आहे. तथापि, आचारसंहितेमुळे याबाबतचा निर्णय घेण्यास लोकप्रतिनिधींनी तसेच प्रशासनाने असमर्थता व्यक्त केली आहे.
या संदर्भात क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त सुनील थोरवे यांनी सांगितले, की पाच महिन्यांपूर्वीच शुल्कवाढीचा निर्णय झाला असून त्याची अंमलबजावणी एक एप्रिलपासून सुरू झाली. ही वाढ रद्द करण्याची मागणी होत असली, तरी आचारसंहितेमुळे त्यावर सध्या निर्णय घेता येणार नाही. १६ मेनंतर आचारसंहिता शिथिल होईल. तेव्हाच स्थायी समिती व पालिका सभेत याबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.