मावळ लोकसभेच्या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वाघेरे यांच्यात आरोप प्रत्यारोपचा कलगीतुरा रंगला आहे. माझ्या विरोधात कोण उमेदवार आहे, हे मला माहीत नाही, असे विधान श्रीरंग बारणे यांनी केल्यानंतर संजोग वाघेरे यांनी देखील श्रीरंग बारणे यांना रावणाची उपमा देत त्यांचा अहंकाराचा मतदारच अंत करतील अशी जहरी टीका केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीचा जोरदार प्रचार सुरू आहे. दोन्ही उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. नुकतीच महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत घटक पक्षाचे शहराध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बारणे यांनी माझ्या विरोधात कोण उमेदवार आहे. हे मला माहीत नाही, असं विधान करत उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच मला उमेदवार कळेल असं वक्तव्य केलं होतं. यावरूनच महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी श्रीरंग बारणे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

हेही वाचा – पुणे: रेल्वे प्रवाशांची रोजचीच लढाई! तिकीट असूनही गाडीत चढता येईना…

हेही वाचा – पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?

श्रीरंग बारणे यांचे विधान हे बालिशपणाचे असून १९८७ पासून मी राजकारणात आणि समाजकारणात कार्यरत आहे. आम्ही दोघेही एकाच मतदारसंघात राहात आहोत, तरी ते मला ओळखत नसतील तर तो त्यांचा अहंकार आहे. वाघेरे यांनी रावणाचे उदाहरण देत “रावणाचादेखील अहंकार जळून खाक झाला होता. रावणाची लंका शेवटी जळाली होती हे बारणेंनी विसरू नये. त्याचप्रमाणे श्रीरंग बारणेंचा अहंकाराचा मतदार अंत करतील”, असा विश्वास संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला.