scorecardresearch

सांगवीत दोन शितोळे, ढोरे यांच्यात तिरंगी सामना

भाजपकडून हर्षल ढोरे, राष्ट्रवादीकडून अतुल शितोळे रिंगणात असून, प्रशांत शितोळे यांनी बंडखोरी केली आहे.

pcmc
पिंपरी चिंचवड महापालिका (संग्रहित छायाचित्र)

चर्चेतील प्रभाग – प्रभाग क्रमांक- ३२ सांगवी

‘श्रीमंत’ महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलेले अतुल शितोळे आणि प्रशांत शितोळे हे राष्ट्रवादीचे दोन विद्यमान नगरसेवक नाटय़मय घडामोडीनंतर ‘आमने-सामने’ आले आहेत. राष्ट्रवादीचे उद्याचे नेतृत्व म्हणून पुढे येत असलेल्या प्रशांत शितोळे यांनी यंदा अनेकांची तिकिटे बसवली. मात्र, त्यांचा स्वत:चाच पत्ता आश्चर्यकारकपणे कापला गेला. सांगवीतील ‘ढोरे-शितोळे’ या पारंपरिक संघर्षांत यंदा दोन शितोळे विरुद्ध एक ढोरे अशी खुल्या गटात होणारी लढत लक्षवेधी आहे.

भाजपकडून हर्षल ढोरे, राष्ट्रवादीकडून अतुल शितोळे रिंगणात असून, प्रशांत शितोळे यांनी बंडखोरी केली आहे. गेल्या वेळी प्रशांत यांना राष्ट्रवादीची उमेदवारी होती व हर्षल ढोरे यांची बंडखोरी होती. चुरशीच्या लढतीत शितोळे १३८ मतांनी विजयी झाले.

ढोरे यांच्या बंडखोरीला तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा आशीर्वाद होता. अजित पवार यांनी मध्यस्थी केली व निर्णायक टप्प्यात ढोरे यांना आवश्यक ‘रसद’ मिळू न शकल्याने प्रशांत शितोळे विजयी झाले.

अतुल शितोळे वेगळय़ा प्रभागातून निवडून गेले होते. पाच वर्षांपासून ‘हर्षल-प्रशांत’ समोरासमोर येणार, असे वातावरण सांगवीत आहे. प्रशांत व अतुल शितोळे यांचे प्रभाग एकत्र आल्याने राष्ट्रवादीत उमेदवारीचा पेच निर्माण झाला. एक सर्वसाधारण व एक जागा सर्वसाधारण महिला गटासाठी आहे.

महिला कोणी द्यायची आणि खुल्या गटात कोणी लढायचे, यावरून बराच काथ्याकूट झाला. ‘योग्य वेळी’ निर्णय घेऊ म्हणत अजित पवारांनी विषय तसाच ठेवला. नाटय़मय घडामोडीनंतर अतुल यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. पॅनेलमध्ये कोणाला घ्यायचे, याचा निर्णयही अतुल यांच्या म्हणण्याप्रमाणे झाला. प्रशांत शितोळे यांच्या दृष्टीने हा मोठा धक्का होता.

जगताप भाजपमध्ये गेल्यानंतर शितोळे यांना राष्ट्रवादीने ‘नेता’ म्हणून पुढे आणले. चिंचवड विधानसभेचे ते दावेदार होते. परिसरातील अनेक उमेदवारांना त्यांची शिफारस होती. असे असताना त्यांनाच डावलण्यात आले.

एका प्रकरणात झालेली जेलवारी, भिशी घोटाळय़ात गोवले गेलेले नाव, गॅसदाहिनी प्रकरण आदी गोष्टी त्यांना भोवल्या. पक्षातील अंतर्गत गटबाजी, ‘आमदारकी’ची स्पर्धा यातून पत्ता कापल्याचे सांगितले जाते. सांगवीत नेहमी ढोरे-शितोळे संघर्ष दिसून येतो. यंदा शितोळे विरुद्ध शितोळे विरुद्ध ढोरे असा तिरंगी सामना असल्याने चुरशीची लढत असल्याची चर्चा आहे.

 

* स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलेले तीन उमेदवार रिंगणात

* ढोरे-शितोळे संघर्षांची परंपरा कायम

* ढोरे-ढोरे व शितोळे-शितोळे यांच्यातही लढती

* राजकीयदृष्टय़ा संवेदनशील प्रभाग

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-02-2017 at 04:22 IST