पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत रेल्वे मार्ग, नदी, चौक आणि महामार्गावर वाहतुकीच्या साेईसाठी ४६ ठिकाणी पूल आणि उड्डाणपूल उभारले आहेत. यामध्ये २० वर्षांहून अधिक आयुर्मान झालेल्या १७ पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड शहर १८१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर वसले आहे. शहराच्या चोहोबाजूस ये-जा करण्यासाठी, तसेच सुरळीत रहदारीसाठी महापालिकेने प्रशस्त रस्त्यांसोबत पवना, मुळा, इंद्रायणी नदी, रेल्वे मार्ग आणि रस्त्यांवर, चाैकात उड्डाणपूल बांधण्यास सुरुवात केली. २००४ मध्ये महापालिकेने निगडी, टिळक चाैकातील कै. महापाैर मधुकर पवळे हा पहिला उड्डाणपूल उभारला. आतापर्यंत शहरातील विविध भागांत ४६ पूल उभारले आहेत. यामधील २९ पूल हे २० वर्षांपेक्षा कमी कालावधीचे आहेत. तर, १७ पुलांचे २० वर्षांहून अधिक आयुर्मान झाले आहे. या पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागाराची नेमणूक करून निविदा प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही सुरू आहे.
हॅरिस, रेल्वे पुलाचे लेखापरीक्षण
पुण्याकडून पिंपरी-चिंचवडकडे येताना दापोडीत इंग्रजांच्या काळात १८९५ मध्ये हॅरिस पूल उभारला होता. वाहतुकीचा ताण वाढल्याने महापालिकेने २०१९ मध्ये समांतर पूल उभारला. चिंचवडमधील रेल्वे पूल १९७८ तर पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपूल १९८३ मध्ये उभारला. हॅरिस ब्रिज, पिंपरी आणि चिंचवड रेल्वे अशा तिन्ही पुलांचे महापालिकेने संरचनात्मक लेखापरीक्षण केले आहे. त्यानुसार पुलांची दुरुस्ती करून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
शहरातील पूल, उड्डाणपूल
नाशिक फाटा येथील भारतरत्न जेआरडी टाटा दुमजली उड्डाणपूल, निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकातील दुमजली उड्डाणपूल, भोसरी, चिंचवडगाव, थेरगावातील डांगे चौक येथील उड्डाणपूल हे शहरातील मोठे पूल आहेत. पिंपरीगाव-पिंपळे सौदागर (दोन पूल), दापोडी-फुगेवाडी, दापोडी-बोपोडी, दापोडी-सांगवी, बोपखेल-खडकी, सांगवी-स्पायसर महाविद्यालय, सांगवी-पुणे विद्यापीठ, निगडीतील टिळक चौक, भोसरी, स्पाईन रस्ता, चिंचवड गावातील मोरया मंदिराशेजारी, चिंचवडगाव ते बिर्ला रुग्णालय, चिंचवड स्टेशन (दोन पूल), चिंचवड येथील मदर टेरेसा उड्डाणपूल, बिजलीनगर, थेरगावातील डांगे चौक, वाकड-हिंजवडी, निगडी-रावेत, सांगवी फाटा-औंध, तळवडे-निघोजे, कासारवाडी-पिंपळे गुरव, दापोडी-पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर-जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, कुदळवाडी उड्डाणपूल यांसह शहरात ४६ उड्डाणपूल आहेत. तर, पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म, चिंचवडगावातील फुलपाखरू, पिंपळे निलख-बाणेर येथील पुलाचे काम सुरू आहे.
शहरात रेल्वे मार्ग, नदी, चौक आणि महामार्गावर ४६ ठिकाणी पूल आणि उड्डाणपूल आहेत. यामधील २९ पुलाचे आयुर्मान २० वर्षांच्या आतील आहे. १७ पुलांचे आयुर्मान २० वर्षांपेक्षा अधिक आहे. या पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण केले जाणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सुरू आहे. – मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका