जमिनींना सोन्याचे भाव आल्यानंतर ज्या भागाचे अर्थकारण पूर्णपणे बदलले, त्यातील बराचसा परिसर या प्रभागात समाविष्ट आहे. नको इतका पैसा खुळखुळत असल्याने येथील सर्वपक्षीय उमेदवारांचे निवडणुकीत पैसा हेच प्रमुख ‘अस्त्र’ राहणार आहे. ‘लक्ष्मीपुत्रां’नी विविध मार्गाने ‘पैशाचा धूर’ करण्यास प्रारंभ केला आहे. जुन्या नोटा रद्द झाल्यानंतरही त्या चालवून घेण्यासाठी मतदारांना आगावू पैसे देण्याची व त्यांची थकबाकी भरण्याची वेगळीच शक्कल इच्छुकांनी लढवल्याचे सांगितले जाते. कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नसलेल्या साडेतीन गावांच्या या पट्टय़ात तुकाराम व मोरेश्वर भोंडवे या सख्ख्या बंधूसह अनेक आजी-माजी नगरसेवक ‘आमने-सामने’ येण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मामुर्डी, साईनगर, किवळे, विकासनगर, भीमाशंकरनगर, आदर्शनगर, कोतवालनगर, रावेत, वाल्हेकरवाडीचा काही भाग, शिंदेवस्ती, गुरूद्वारा असे दूपर्यंत पसरलेले नव्या प्रभागाचे क्षेत्र आहे, त्यामुळे उमेदवारांची बऱ्यापैकी दमछाक होणार आहे. सन १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांमधील बराचसा भाग यात आहे. सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, ओबीसी महिला आणि अनुसूचित जाती असे आरक्षण आहे. स्थानिक मंडळींकडे ओबीसी दाखले असू शकतात, त्यामुळे ओबीसी महिला गटातील गणिते बदलू शकतात. बैठी घरे, चाळी, सोसायटय़ा अशी संमिश्र व दाट लोकवस्ती व काही प्रमाणात झोपडपट्टी असे प्रभागाचे स्वरूप आहे. या भागातील जमिनींना मोठा भाव मिळतो आहे. गहुंज्याचे स्टेडियम, द्रुतगती महामार्ग, बीआरटी आदींसह परिसरात बरीच विकासकामे सुरू आहेत, याचा एकत्रित परिणाम म्हणजे स्थानिक माणसाकडे तसेच जमीनधारकांकडे पैसा खुळखुळतो आहे. इच्छुकांची संख्या वाढली असून निवडणुकांच्या निमित्ताने हा पैसा बाहेर पडू लागला आहे. वातावरणनिर्मिती म्हणून प्रभागात सध्या कार्यक्रमांची, भेटवस्तूंचे वाटप, फ्लेक्सबाजीची चढाओढ दिसून येते. लग्नसराईत शक्तिप्रदर्शन करण्याची संधी सोडायला कोणी तयार नाही. उमेदवारी मिळवण्यासाठी ‘सौदेबाजी’ची परंपरा यंदाही कायम राहण्याची चिन्हे आहेत. ‘गावकी-भावकी’चे राजकारण रंगात येऊ लागले आहे.

सन २००२ च्या निवडणुकीत रावेत-किवळे-पुनावळे-मामुर्डी असा प्रभाग होता. तेव्हा काँग्रेसचे तुकाराम भोंडवे, किसन नेटके व भाजपच्या मीना ढोले निवडून आल्या होत्या. सन २००७ मध्ये एकसदस्य प्रभाग पध्दतीत रावेत-पुनावळ्यातून गणेश भोंडवे, किवळ्यातून मनोज खानोलकर, विकासनगरमधून तुकाराम भोंडवे निवडून आले. सन २०१२ मध्ये सर्व तरस परिवार एकत्र आल्याने किवळ्यातून बाळासाहेब तरस निवडून आले. रावेत-वाल्हेकरवाडी भागातून मोरेश्वर भोंडवे निवडून आले. आता हे सर्व क्षेत्र एकत्र आल्याने तरस आणि भोंडवे परिवार ‘आमने-सामने’ आले आहेत. तुकाराम भोंडवे आणि मोरेश्वर भोंडवे हे सख्खे भाऊ यापूर्वी दोन वेळा विरोधात लढले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipal corporation election
First published on: 21-12-2016 at 04:09 IST