पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज मंगळवारी (११ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात प्रभागनिहाय आरक्षण साेडत काढण्यात येणार आहे. तीन प्रभागांतील बदल वगळता प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच झाली आहे. त्यामुळे या साेडतीकडे इच्छुकांसह माजी नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांना निवडणूक लढण्यासाठीचे चित्र स्पष्ट हाेणार आहे. चार टप्प्यांमध्ये सोडत होणार आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय पद्धतीने हाेणार आहे. यासाठी ३२ प्रभाग असून १२८ नगरसेवक संख्या कायम आहे. राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीसाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. ए-फोर साईजच्या कोऱ्या कागदावरून आरक्षणाच्या चिठ्ठ्या तयार केल्या जातील. एका रंगाच्या रबरने त्या गुंडाळल्या जातील. पारदर्शक गोल डब्यामध्ये टाकून फिरविल्यानंतर शाळेतील मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत, असे निवडणूक विभागाने सांगितले.
चार टप्प्यांमध्ये सोडत काढली जाणार आहेत. प्रभागांमध्ये राखीव जागा वाटप करून पहिल्यांदा अनुसूचित जाती महिला आरक्षण सोडत काढली जाईल. त्यानंतर अनुसूचित जमाती महिला आरक्षण सोडत काढली जाणार आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाची सोडत, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांकरिता राखीव केला जाईल. सर्वसाधारण महिलांकरिता जागा नेमून दिल्या जातील, असे निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.
असे असणार आरक्षण
महापालिकेच्या १२८ पैकी अनुसूचित जातीसाठी (एससी) २० (महिलांसाठी दहा), अनुसूचित जमातीसाठी (एसटी) तीन (महिलांसाठी दोन), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) ३४ (महिलांसाठी १७) जागा राखीव असणार आहेत. खुल्या गटात असलेल्या ७१ जागांमध्ये महिलांसाठी ३५ तर ३६ जागा या सर्वसाधारण गटासाठी राखीव असणार आहेत. १२८ पैकी महिलांसाठी निम्म्या म्हणजे ६४ जागा असणार आहेत.
वाहनांना बंदी
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह परिसरात शासकीय वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी केली आहे. आरक्षण सोडतीच्या ठिकाणी खासगी वाहने आणू नयेत, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.
