पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड गावातील क्रांतिवीर चापेकर स्मारकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. या स्मारकासाठी ‘क्रांतिवीर चापेकर भारतीय वारसा दर्शन’ या नावाने स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १२ जणांचे संचालक मंडळ निश्चित करण्यात आले आहे. या कंपनीद्वारे स्मारकाचे कामकाज चालणार आहे.

स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामध्ये क्रांतिवीर चापेकर बंधूंचे कार्य अनन्यसाधारण आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण राहावे. नव्या पिढीला स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातून प्रेरणा मिळावी. देशप्रेमाची जागृती वाढवावी. भारतीय संस्कृतीचा ठेवा जतन व्हावा. या उद्देशाने क्रांतिवीर चापेकर बंधू संग्रहालयाची निर्मिती चापेकर वाडा येथे केली आहे. स्मारकाच्या व्यवस्थापनाबाबत महापालिकेने स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करणे व त्यासाठी गिरीश परळीकर यांची कंपनी सचिव म्हणून नेमणूक करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची मान्यता दिली आहे.

चापेकर वाडा येथील संग्रहालयाचे दैनंदिन कामकाज, आवश्यक सोयी-सुविधा पुरविणे, संकेतस्थळ तयार करणे, ऑनलाइन तिकीट नोंदणी व पेमेंटची व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिकेकडून बँक ऑफ महाराष्ट्रच्या पिंपरी शाखेकडून पॉश मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

संचालक मंडळात कोणाचा समावेश ?

क्रांतिवीर चापेकर भारतीय वारसा दर्शन संस्थान या कंपनीचे व्यवस्थापनासाठी बारा जणांचे संचालक मंडळ निश्चित करण्यात आले. पदसिद्ध अध्यक्ष महापालिका आयुक्त असणार आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन, शहर अभियंता मकरंद निकम, क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील, कायदा सल्लगार राजेश आगळे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे गिरीश प्रभुणे, मिलिंदराव देशपांडे, ॲड. सतीश गोरडे यांची पदसिद्ध संचालक म्हणून नेमणूक केली आहे. तर महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता हे संचालक असणार आहे.

प्रवेश शुल्क निश्चित

क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयातील प्रवेशाचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तीन वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत प्रवेश असणार आहे. तीन ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ५० रुपये, १८ वर्षांपुढील नागरिकांसाठी शंभर रुपये तिकीट दर निश्चित केला आहे. तसेच शाळा व महाविद्यालयांसाठी प्रवेश शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

पाचवी कंपनी

महापालिका प्रशासनाकडून स्वतंत्रपणे संचलित प्रकल्पांमध्ये आणखी एका प्रकल्पाची भर पडली आहे. यापूर्वी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर व सायन्स पार्क, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी, चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ, मोरवाडी येथील दिव्यांग भवन या प्रकल्पांसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली आहे. कंपन्यांमार्फत त्यांचा कारभार चालविला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चापेकर वाडा येथील संग्रहालयाचे दैनंदिन कामकाज, आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याचे काम कंपनीमार्फत केले जाणार आहे. – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका