पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील अनधिकृत फलकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. आकाश चिन्ह व परवाना विभागाने एक एप्रिल ते ३१ जुलै या चार महिन्यात ४७ हजार १३ पोस्टर्स, फलक, किऑस्कवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून चार लाख ६८ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे, तर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता शहरात अनधिकृत फलक लावणाऱ्यांविरूद्ध कडक मोहीम राबविण्यात येणार असून, संबंधितांवर दंड आकारण्याबरोबरच फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक ठिकाणी लग्न, वाढदिवस, स्वागत, निवडणूक, धार्मिक व अन्य कार्यक्रमांचे अनधिकृत फलक लावले जातात. यामुळे शहर विद्रुप होते. वाहतुकीसही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अनधिकृत फलक लावू नयेत यासाठी सर्व राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी व शहराध्यक्षांनाही महापालिकेने पत्राद्वारे आवाहन केले.
आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या वतीने वेळाेवेळी अनधिकृत फलक, पोस्टर्स, किऑस्कवर कारवाई केली जात आहे. मात्र, त्यानंतरही शहरातील विविध चौका-चौकात फलक लावले जात आहेत. आगामी काळात दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, दिवाळी असे माेठे सण आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात अनधिकृत फलक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने कडक भूमिका घेतली आहे. अनधिकृत फलकांवर धडक कारवाई सुरु केली आहे.
शहरात कोणतीही व्यक्ती, संस्था, व्यापारी, उद्योजक, राजकीय कार्यकर्ते यांनी महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता जाहिरात फलक, किऑक्स लावल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांना नोटीस
शहरात व्यवसाय करण्यासाठी महापालिकेचा परवाना बंधनकारक असताना शहरातील व्यावसायिक, दुकानदार आणि विक्रेते महापालिकेचा परवाना काढण्यास टाळाटाळ करत असल्याचे महापालिकेच्या तपासणीतून समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने परवाना न घेणाऱ्या व्यावसायिकांचे सर्वेक्षण सुरू केले. ज्यांनी परवाना घेतला नाही, त्यांना नाेटीस बजाविण्यात येणार आहे.
शहरात अनधिकृत फलक लावू नयेत. महापालिकेने परवानगी दिलेल्या अधिकृत होर्डिंगवरच जाहिरात करावी. यापुढे शहरात अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई केली जाईल. राजेश आगळे, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका