पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.
चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाल्हेकरवाडी परिसरात सहा चारचाकी आणि तीन रिक्षांना लक्ष करत काचा फोडल्या आहेत. सिमेंटच्या गट्टूने वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी दिली आहे. वाहन तोडफोडीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पाच जणांच्या टोळक्याने ही तोडफोड केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पाच जणांपैकी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आल आहे. इतर तिघांचा शोध पोलीस घेत आहेत.
सर्वसामान्य नागरिक रस्त्याच्या कडेला आपली वाहने पार्क करतात. परंतु, अशा पद्धतीने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती वाहनांना लक्ष करत सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान करत आहे. या आधीदेखील पिंपरी-चिंचवडमध्ये अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत. पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्यादेखील आवळल्या आहेत. धुडगूस घालून वाहनांच्या काचा फोडायच्या आणि दहशत निर्माण करायची, हाच या गुन्हेगारांचा उद्देश असतो.