पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बांगलादेशात पाठविले. लोहगाव विमानतळावर सहा जणांना सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताब्यात देण्यात आले. बीसएफकडून विशेष विमानाने त्यांची रवानगी बांगलादेशात करण्यात आली.
मोहम्मद उस्मान शिराजुन अली शेख (४०), अब्दुल्ला शागर मुल्ला (२५), मोबिन हारून शेख (३९), जहांगीर बिल्ला मुल्ला (३५), मोहम्मद इलाहिन इलियाज बिश्वास (२२) आणि तोहीद मुस्लेम हसन शेख (३१) अशी बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा बांगलादेशी नागरिक भुजबळ चौक वाकड येथून मुंबईकडे जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यांच्याकडे बांगलादेशी असल्याचे पुरावे आढळून आले. त्यांना २२ जुलै रोजी त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले. पुणे विमानतळावरून त्यांना गुवाहाटी येथे नेण्यात आले. तेथून पुढे बीएसएफच्या नियोजनानुसार त्यांना बांगलादेशात पाठविण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून (सन २०१८) शहरातून प्रथमच अशा प्रकारे विशेष विमानाने बांगलादेशात रवानगी करण्यात आली आहे. रोहिंगे आणि बांगलादेशी घुसखोरांच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात उजळणी करण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत चार रोहिंगे आणि ४७ बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात यश आले आहे. शहरातील कामगार, वसाहत चाळ, भाडेकरूंची संख्या असलेल्या दाट लोकवस्तीमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
७४ पारपत्र रद्द, चार पॅनकार्ड रद्द
बांगलादेशी, रोहिंगे नागरिकांनी भारतीय नागरिक असल्याचे भासवून अनधिकृतपणे काढलेले पारपत्र रद्द करण्यासाठी पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखा (एटीबी)कडून पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार पुणे प्रादेशिक पारपत्र कार्यालय, गोवा आणि गुवाहाटी येथून एकूण ७४ पारपत्र रद्द करण्यात आले. तसेच बांगलादेशी नागरिकांनी काढलेले चार पॅनकार्ड देखील रद्द करण्यात आले.
आयुक्तालय स्तरावर ‘एटीबी’ आणि ‘एटीपी’
आयुक्तलय स्तरावरील दहशतवाद विरोधी शाखा (एटीबी)साठी एक पोलीस निरीक्षक आणि सात अंमलदार नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी कक्ष (एटीपी) कार्यान्वित करण्यात आला. सहायक निरीक्षक किंवा उपनिरीक्षक दर्जाचा एक अधिकारी आणि दोन अंमलदार या एटीपी कक्षात नियुक्त करण्यात आले आहेत.