पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ नाट्य प्रयोग कला महोत्सवाचे आयोजन केले आहे. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृहात उद्यापासून (दि. १९) ते रविवार (दि. २१) हा कला महोत्सव होणार आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर लगेचच इदागुणजी महागणपती यक्षगान मंडळी केरेमाने यांचे पंचपटी कथानाट्याचे सादरीकरण होणार आहे. याबाबतची माहिती महोत्सवाचे संयोजक व पैस रंगमंचाचे संस्थापक प्रभाकर पवार यांनी दिली.

शुक्रवारी सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत पैस करंडक अंतर्गत शालेय नाट्यछटा व एकपात्री अभिनय स्पर्धा होईल. तसेच खुल्या गटाच्या मूकनाट्य, लघुनाटिका स्पर्धा होतील. सकाळी साडेनऊ वाजता संस्कार भारती व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा यांच्या सहयोगाने आयोजित चित्रकला प्रदर्शन, तसेच रंगदर्शन याचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होईल.

सकाळी १० ते १२ या वेळात यक्षगान मंडळींची यक्षगानावर प्रयोगकला अभ्यासवर्ग-कार्यशाळा होईल. त्यानंतर महापालिकेच्या संगीत अकादमीचा पूर्वरंग हा कार्यक्रम होईल. शनिवारी सायंकाळी पाच वाजता पिंपरी-चिंचवड परिसरात नाट्यकलेसह सांस्कृतिक क्षेत्रात योगदान असणाऱ्या संस्थांचा ‘प्रयोगकला सन्मान’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

सायंकाळी ‘कलगीतुरा’ या नाटकाचे सादरीकरण व चर्चासत्र होईल. दरम्यान, सकाळी सात ते अकरा या वेळात नाट्यगृह परिसरात महाविद्यालयीन व खुल्या पथनाट्य स्पर्धा होतील. त्यानंतर बारा वाजता मुख्य रंगमंचावर जयपूर (राजस्थान) येथील रंग मस्ताने संस्थेचे ‘महारथी’ या ‘फिजिकल थिएटर’ माध्यमातून हिंदी नाटकाचे सादरीकरण व चर्चासत्र होईल.

एफटीआयआयचे माजी विभागप्रमुख प्रा. समर नखाते यांचा ‘रंगानुभूति: सन्मान’ देऊन रविवारी गौरव करण्यात येणार आहे. यानंतर ‘ठकीशी संवाद’ या मराठी नाटकाचे सादरीकरण आणि त्यावर चर्चासत्र होईल. त्यापूर्वी सकाळी दहा वाजता ‘फिजिकल थिएटर’ आयोजित अभ्यासवर्ग-कार्यशाळा होईल. दुपारी साडेबारा वाजता ‘एकलनाट्य कावडकथा – माया’ या हिंदी भाषेतील नाटकाचे सादरीकरण व चर्चासत्र होईल.

दुपारी दोन वाजता वंदना घांगुर्डे यांची श्रीकांत चौगुले हे प्रकट मुलाखत घेतील. या तीन दिवसीय महोत्सवाला प्रवेश विनामूल्य आहे. मात्र, प्रवेशिका आवश्यक आहे. विनामूल्य प्रवेशिकांसाठी प्रियंका राजे (८६००९००३९०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.